Anjali Damania Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तीन महिने उलटले आहेत. याप्रकरणी सीआयडीने नुकतंच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, सीआयडीच्या दोषारोप पत्रातून या घटनेचे काही फोटो समोर आले आहेत. हे काळीज चिरणारे फोटो पाहून राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. वाल्मिक कराड व त्याची गुंडांची टोळी, कराडचे निकटवर्तीय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात लोक संताप व्यक्त करत आहेत. हे फोटो पाहून सामान्यांचा थरकाप उडालेला असताना संतोष देशमुख यांचं कुटुंब हादरून गेलं आहे. संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हे फोटो पाहून धाय मोकलून रडू लागल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, धनंजय टोकाचा निर्णय घेण्याची भाषा बोलू लागल्याचं सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी सांगितलं.
अंजली दमानिया यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांच्यासारख्या मंत्र्याला बडतर्फ का करत नाहीत. असा मंत्री माझ्या मंत्रिमंडळात नको, अशा प्रकारचा आदेश द्यायला मुख्यमंत्र्यांना दोन मिनिटे सुद्धा लागायला नकोत. संतोष देशमुख खूनाचं प्रकरण गेल्या कित्येक दिवसांपासून खोळंबलं आहे. देशमुख कुटुंबाला अद्याप न्याय मिळालेला नाही. काल त्यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले ते पाहून महाराष्ट्रातील जनता झोपू शकली नाही. मला लोकांचे मेसेजेस येत आहेत. लोक आपल्या तीव्र भावना व्यक्त करत आहेत, रडत आहेत. त्या हत्याकांडाचे व्हिडिओ व फोटो वृत्तवाहिन्यांवर दाखवताना माध्यमांचे प्रतिनिधी, त्यांचे वृत्त निवेदक रडत आहेत. मात्र आपलं शासन इतकं निष्ठुर झालं आहे, इतकं अमानवीय झालंय की त्यांना अजूनही या प्रकरणात केवळ राजकारणच करायचं आहे. अजूनही ते फक्त राजीनामा घेण्याची भाषा करत आहेत. हे सर्व पाहून काय बोलावं ते सुचत नाही.
अंजली दमानियांचा संताप
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, या हत्याकांडाचे फोटो पाहून मी झोपू शकले नाही. मला रात्री अडीच वाजता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा मेसेज आला. ते मला म्हणाले, ताई मला हे सगळं बघवत नाही. मी आता काहीतरी निर्णय घेणार आहे. मी सात वाजता त्यांना फोन केला आणि त्यांना विनंती केली की असं काहीच करू नका. आतापर्यंत तुम्ही खूप शांत राहिलात. खूप संयमाने हे सगळं प्रकरण हाताळलंत. आताही शांत राहा. तुमच्यावरच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. तुमची व तुमच्या भावाची मुलं आता तुमच्यावरच अवलंबून आहेत. दुसऱ्या बाजूला, इतकं भीषण वास्तव आपल्यासमोर असताना देखील शासन अजूनही नेमकी कसली वाट बघतंय. अजूनही ठोस कारवाई का करत नाहीत. धनंजय मुंडेंना बडतर्फ का करत नाही. केवळ तशी भाषा चालू आहे. हे सगळं पाहून काय बोलावं ते सुचत नाही. मला आता या राजकारणाचाच कंटाळा आला आहे.