राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या एका निर्णयाने खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होतानाच आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसेच, इथून पुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असंही त्यांनी जाहीर केलं. शरद पवारांची राजकीय आत्मकथा ‘लोक माझे सांगाती’च्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत असताना शरद पवारांनी त्यांच्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवारांच्या निर्णयानंतर उपस्थित कार्यकर्ते आणि नेतेमंडळींना अश्रू अनावर झाले. सगळ्यांनी घोषणाबाजी केली. तसेच अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निर्णय शरद पवार मागे घेत नाहीत तोपर्यंत इथून जाणार नाही असा पवित्रा घेतला. काही कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील राजीनामा देण्याचा इशारा दिला. एकीकडे सर्वजण शरद पवारांच्या निर्णयाला विरोध करत असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी मात्र शरद पवारांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच, रडणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी खडसावलं. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्याशी आपली चर्चा झाली असल्याचंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, अजित पवारांची ही भूमिका काही कार्यकर्त्यांना, विशेषतः शरद पवार समर्थकांना आवडली नाही. अजित पवारांच्या भूमिकेवरही राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबद्दल एक ट्वीट करत अजित पवारांना टोला लगावला आहे. दमानिया यांनी एका ट्वीटमध्ये लिहिलं आहे, “अजित पवार खूप उतावीळ दिसत आहेत. शरद पवारांचा राजीनामा स्वीकारला जाईल याची ते खात्री करून घेत आहेत.”

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

यावेळी अजित पवार म्हणाले की, “सगळ्यांच्या भावना पवार साहेबांनी ऐकल्या आहेत, पाहिल्या आहेत. तुम्ही गैरसमज करून घेताय. शरद पवार अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षात नाही असं होत नाही. आज काँग्रेसचे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खर्गे आहेत. परंतु काँग्रेस चालतीये ती सोनिया गांधींकडे बधून. त्यामुळे शरद पवारांच्या आत्ताच्या वयाचा विचार करता सगळ्यांशी चर्चा करून एका नव्या नेतृत्वाकडे ही जबाबदारी ते देऊ पाहतायत. हे नवं नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचं काम करेल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anjali damania slams ajit pawar over his stand on sharad pawar steps down as ncp chief asc