शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी (८ फेब्रुवारी) रात्री गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर त्यांना तत्काळ करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. मॉरिस नोरोन्हा या इसमाने घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर मॉरिसने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे दहिसर हादरलं आहे. त्याचबरोबर पोलिसांनी रुग्णालय परिसर सील केला आहे.
या हत्याकांडामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात कल्याणमध्ये भाजपा आमदाराने शिंदे गटातील नेत्यावर पोलीस ठाण्यात जाऊन गोळीबार केला होता. राज्यात अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या घटनांमुळे विरोधक राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करू लागले आहेत. तसेच राज्य सरकारवर टीका करत आहेत. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीदेखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
अंजली दमानिया यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, राज्यात हे काय चाललंय? कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली? सदा सरवणकरांच्या बंदुकीचा गोळीबार काय, गणपत गायकवाडांचा पोलीस ठाण्यातला गोळीबार काय, नितेश राणेंची खुलेआम धमकी काय, हे सगळं काय चाललंय? गृहमंत्री फोडाफोडीच्या राजकारणात इतके माशगुल झाले आहेत की गुंडगिरीला आळा घालायला त्यांच्याकडे बहुदा वेळच उरलेला दिसत नाही. गुंडांना पाठीशी घालण्याचे हे दुष्परिणाम आहेत. खूपच हादरवून टाकणारी ही घटना आहे.
त्यापाठोपाठ अंजली दमानिया यांनी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. त्या म्हणाल्या, काल संध्यकाळी घडलेली घटना धक्कादायक आहे. राज्यात चालू असलेलं राजकारण आणि अशा प्रकारच्या घटना पाहून प्रश्न पडतोय की, आपल्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का? हत्या आणि गोळीबार करण्यासाठी या लोकांकडे बंदुका कुठून येतात, कशा येतात? या लोकांवर कोणाचाच वचक दिसत नाही. दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, गावागावांमधील भांडणं थांबवण्यासाठी ‘तंटामुक्त गाव’ हे अभियान राबवलं होतं. तसंच अभियान या सत्ताधाऱ्यांनीही आपसांत राबवण्याची गरज आहे. राज्याचे गृहमंत्री पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नाही.