Anjali Damania on Beed Murder Case Charge sheet : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची गेल्या अनेक दिवसांपासून देशभर चर्चा होत आहे. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग तपास करत आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दोषारोप पत्र दाखल केलं आहे. ज्यामध्ये खंडणीत आडवे आल्याने संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून या प्रकरणातील आरोपींनी कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. दुसऱ्या बाजूला हत्येच्या दोन महिन्यांनी तपास अधिकाऱ्यांनी दोषारोप पत्र दाखल केलं आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या दोषारोप पत्रातील काही कथित मुद्दे समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत.

या दोषारोप पत्रात संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या टोळीचा प्रमुख वाल्मिक कराड नसून सुदर्शन घुले हा असल्याचं नमूद केल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच वाल्मिक कराडच्या या प्रकरणातील सहभागाबाबतचे मुद्दे अपूर्ण असल्याचं म्हटलं आहे. हा सगळा प्रकार वाल्मिक कराडला कायद्याच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी केला जातोय का? असा प्रश्न देखील दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

अंजली दमानिया यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

दमानिया यांनी त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की “बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये काही मुद्दे संशयास्पद आहेत. खाली दिलेले मुद्दे कसे आणि का लिहिले गेले? पहिला मुद्दा – पान ३६ वर ‘टोळीचा प्रमुख सुदर्शन घुले’ असा उल्लेख का केलाय? तो टोळीचा प्रमुख कसा? पुढच्या पानावर जरी वाल्मिक कराड नंबर १ वर असेल, तरीही हे वाक्य वगळले पाहिजे. दुसरा मुद्दा – वाल्मिक कराडबद्दल लिहिलं आहे की त्यांनी ‘आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करावा लागेल’ असे त्याने सुदर्शन घुले याला सांगितलं आणि “कामाला लागा आणि विष्णू चाटेशी बोलून घ्या”. चार्जशीटमध्ये एवढंच लिहिलं आहे. हे सर्व पाहून उद्या वाल्मिक कराड म्हणेल, ‘मी कुठे त्यांना मारा असे म्हटले?’ ही कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याची पळवाट आहे का?”

Story img Loader