आम आदमी पक्षाने भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सक्रिय असणाऱ्या अंजली दमानिया यांना भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूर लोकसभेच्या जागेसाठी रिंगणात उतरविण्याचा विचार सुरू केला आहे. पूर्ती उद्योग समूहातील कथित गैरव्यवहारावर प्रकाश टाकून गडकरींना अडचणीत आणल्यानंतर अंजली दमानिया प्रकाशझोतात आल्या होत्या. दमानिया यांनीदेखील संधी मिळाल्यास गडकरींविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास उत्सुक असल्याचे स्पष्ट केले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या ‘आप’ने लोकसभेसाठी कंबर कसली आहे. त्यानुसार नागपूर येथील लोकसभेच्या जागेसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात अंजली दमानिया यांच्या नावाचा विचार सुरू केला आहे.
याबाबत ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना  दमानिया  यांनी सांगितले की, वैयक्तिक कारणे आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे मी निवडणुकीतील सहभागाबद्दल अधिक उत्सुक नव्हते. मात्र तरीही पक्षातील वरिष्ठ सहकाऱ्यांनी गडकरींविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याबाबत विचारणा केली.
पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य मयंक गांधी यांनीही गडकरींविरोधात निवडणूक लढण्याबाबत आपल्याला आग्रह केला आहे. त्यामुळे मीदेखील निवडणूक लढण्याबाबत निर्णय घेतला आहे, परंतु माझ्या नावाच्या निश्चितीबाबत नागपूर येथील पक्षाचे पदाधिकारीच निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.

Story img Loader