१९ वर्षीय तरुणी अंकिता भंडारी मागील काही दिवसांपासून बेपत्ता होती. अखेर शनिवारी उत्तराखंडच्या हृषीकेशमधील पुलकित आर्या यांच्या ‘वनतारा’ रिसॉर्टजवळील कालव्यात अंकिता भंडारीचा मृतदेह आढळून आला आहे. मृत तरुणी याच रिसॉर्टमध्ये रिसेप्शनीस्ट म्हणून काम करत होती. या तरुणीच्या खूनप्रकरणी उत्तराखंडमधील भाजपा नेते विनोद आर्या यांचे पूत्र पुलकित आर्याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अन्य दोन साथीदारांनाही अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत अंकिता भंडारी उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील यमकेश्वर ब्लॉकमधील एका रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. मागील काही दिवसांपूर्वी ती अचानक बेपत्ता झाली होती. शनिवारी तिचा मृतदेह सापडला असून शुक्रवारी एक दिवस आधीच पोलिसांनी अंकिताच्या हत्येप्रकरणी भाजपा नेते विनोद आर्या यांचा मुलगा पुलकित आर्या आणि त्यांच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.
दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी तपास केल्यानंतर एसआयटीने नवा खुलासा केला आहे. डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितलं की, मृत तरुणीने रिसॉर्टवर आलेल्या अतिथींसोबत लैंगिक संबंध ठेवावेत, म्हणून रिसॉर्टचा मालक पुलकित आर्या तिच्यावर दबाव आणत होता. पीडित तरुणीने लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने आरोपींनी तिची हत्या केल्याचा खुलासा मृत तरुणीच्या एका फेसबूक फ्रेंडने केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
संबंधित तिन्ही आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने सर्व आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रिसॉर्टचे मॅनेजर सौरभ भास्कर आणि सहाय्यक मॅनेजर अंकित गुप्ता यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. हत्या करून त्यांनी अंकिताचा मृतदेह कालव्यात टाकल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तुपास पोलीस करत आहेत.