सक्षम जनलोकपाल विधेयकासाठी आग्रही असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी राळेगणसिद्धीत उपोषणाला सुरुवात केली. अण्णांना पाठिंबा दर्शवण्यासाठी देशभरातून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी राळेगणसिद्धी गजबजून गेले आहे. दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल विधेयक नक्की मंजूर होईल असे आश्वासन देत केंद्र सरकारने अण्णांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
देशभक्तिपर गीते, सगळ्यांच्या हातात तिरंगा, स्वत अण्णा या सर्वाच्या अग्रभागी अशा वातावरणात मंगळवारी सकाळी राळेगणसिद्धीत अण्णांनी उपोषणाला सुरुवात केली. त्यांनी प्रथम येथील संत निळोबारायाच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर मिरवणुकीने अण्णांना उपोषणस्थळावर नेण्याचे प्रयोजन होते. मात्र, अण्णांनी त्यास नकार देत जमलेल्या महिला, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांबरोबर उपोषणस्थळी जाण्याचे ठरवले. उपोषणस्थळी पोहोचल्यानंतर अण्णांनी जनलोकपाल विधेयकाला मंजुरी मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा पुनरुच्चार केला.  उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळावर ठाण मांडत देशभक्तिपर गीते, भजने म्हणण्यास सुरुवात केली.
दरम्यान, उपोषणाचे ‘लाइव्ह कव्हरेज’ मिळवण्यासाठी विविध वृत्तवाहिन्यांच्या ओबी व्हॅन्सही राळेगणसिद्धीत डेरेदाखल झाल्या आहेत.
राज्य सरकारची धावाधाव
अण्णांनी उपोषण सोडावे यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले. ‘उतारवयात तब्येतीला जपा, उपोषण करू नका’, असा मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात मंगळवारी सायंकाळी नागपूरहून राळेगणसिद्धीत दाखल झाले. त्यांनी अण्णांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु तब्येत ठणठणीत असून विधेयक संमत झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे अण्णांनी थोरात यांच्याकडे स्पष्ट केले.