आपले मरण हे मरून गेलेले असल्यामुळे आता मला पोलीस संरक्षणाची गरज नाही, असे सांगतानाच सध्या देण्यात आलेल्या संरक्षणामधील अनेक गंभीर त्रुटींवर बोट ठेवून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गृह खात्याच्या डोळय़ांत झणझणीत अंजन घातले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदारीची जाणीव कमी होत चालली असल्याची टीकाही त्यांनी पत्रकाद्वारे केली.
सुरक्षेत वाढ केल्याचे वृत्त वाचून दु:ख झाल्याचे नमूद करून हजारे म्हणतात, जीवनात वयाच्या २६व्या वर्षीच अविवाहित राहून जीवनाचा प्रत्येक क्षण देशसेवेत लावण्याचा निर्णय घेतला. आज वयाच्या ७८ व्या वर्षांपर्यंत ईश्वराने अखंडपणे सेवा करत असताना तेरा ते चौदा वेळा आलेल्या धमक्यांमुळे माझ्या संरक्षणात गृह खात्याकडून वाढ केली जात आहे. आपण यापूर्वी चार वेळा सरकारला पत्र पाठवून मला संरक्षणाची गरज नाही, संरक्षण दूर करण्याची मागणी केली. मात्र सरकार संरक्षण दूर न करता त्याउलट त्यात वाढ करीत आहे. सरकारच्या फक्त संरक्षणामुळे माझे मरण थांबेल का? थांबेल म्हणावे तर देशाच्या उच्च पदावर असणाऱ्या इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी यांनासुद्धा सरकार वाचवू शकले नाही, तर माझ्यासारख्या मंदिरात राहणाऱ्या फकीर माणसाचे काय? मला मारण्यासाठी काही वेळेला सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले आहे, मात्र ईश्वर कृपेने मी अद्यापि जिवंत आहे. राळेगणसिद्धीसारख्या अडीच हजार लोकसंख्येच्या गावात ९ अंगरक्षक व २८ पोलीस कर्मचारी यांची सर्वाची राहण्याची व इतर सोय करणे सोपे काम नाही.
सकाळी साडेपाच वाजता आपण फिरण्यासाठी बाहेर जातो त्या वेळी काही वेळा एकही अंगरक्षक सोबत नसतो. अनेकदा आपण बाहेर गेल्यानंतर पोलिसांनी अंगरक्षकाला झोपेतून उठवले आहे. घाई झाल्यामुळे अनवाणीपणे फिरणारे अंगरक्षकही आपण पाहिले आहेत. संरक्षणासाठी ठेवलेले पोलीसही खुर्चीवर बसून मोबाइलमध्ये इतके गर्क झालेले असतात की ज्या वेळी आपण योगासने करतो त्या वेळी मारणारे आपणास कधी मारून जातील हेही कळणार नाही. राळेगणसिद्धीत पोलिसांच्या दोन गाडय़ा रात्रंदिवस तैनात असतात, मात्र आपण दौऱ्यावर असताना कधीकधी एकही वाहन नसते. वाहन असेल तर वाहनातील अंगरक्षक झोपलेले असतात. या पोलीस संरक्षणावर एका निरीक्षकाची नेमूणक करण्यात आली आहे, हे आपणास दि. २ मार्चला समजले. आजवर या निरीक्षकांना आपण एकदाही पाहिले नाही. हा प्रश्न अण्णा हजारे यांच्या संरक्षणाचा नाही तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदारीची जाणीव कमी होत चालली आहे, हा आहे.
अंगरक्षक व पोलीस यांचा आपल्या संरक्षणाच्या माध्यमातून जवळून संबंध आल्यामुळे काही अंगरक्षक आणि पोलीस यांच्यामध्ये शिस्तीचा अभाव पाहून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे काय होणार हा प्रश्नच वाटतो. आपले जीवनच समाज आणि राष्ट्रहितासाठी अर्पण केलेले असल्याने माझी शासनाला विनंती आहे, की माझे संरक्षण वाढवू नका. त्यामुळे मला त्रास होतो आहे, कारण तो जनतेचा पैसा आहे. मी शासनाला लिहून देतो, की उद्या माझ्या जिवाचे काही कमीजास्त झाले तर ती सर्वस्वी जबाबदारी माझी राहील. त्याचा दोष शासनावर राहणार नाही. संरक्षणाचा पोलीस यंत्रणा समजते तेवढा आपणास उपयोग होत नाही. एका बाजूला राज्यामध्ये पुरसे पोलीस कर्मचारी नसल्याने सुरक्षाव्यवस्थेवर ताण पडतो. जिथे गरज आहे तिथे पोलिसांची संख्या अपुरी आहे. उपलब्ध संख्या आहे त्यांच्यामध्ये सामाजिक, राष्ट्रीय दृष्टिकोन कमी होत असल्याने कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येत आहे. समाजाचा पैसा वाया चालला आहे, असे मनोमन वाटायला लागते. ज्या राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे, त्या राज्याला हे परवडणारे नाही असे आपले मत असल्याचे हजारे यांनी पत्रकात म्हटले आहे.
पोलीस संरक्षणातील त्रुटींवर अण्णांची टीका
आपले मरण हे मरून गेलेले असल्यामुळे आता मला पोलीस संरक्षणाची गरज नाही
Written by लोकसत्ता टीम
First published on: 07-03-2016 at 02:31 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anna hazare comment on police security