थकवा व उष्णतेचा त्रास
थकवा तसेच उष्णतेचा त्रास झाल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना गुरूवारी नगर येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दोन दिवसांपासून थकवा जाणवत असल्याने हजारे यांनी विश्रांती करणेच पसंत केले होते. ते पहाटे फिरायलाही जात नव्हते. गुरूवारी सकाळी नऊच्या सुमारास हजारे आंघोळीला गेले. आंघोळीनंतर त्यांना त्रास जाणवू लागल्याने स्वयंसेवक श्याम पठाडे यांनी तातडीने पारनेर येथील डॉ. रफ़ीक सय्यद यांच्याशी संपर्क साधून त्यांना राळेगणसिद्धीत पाचारण केले. आंघोळीनंतर हजारे यांना चक्कर आली. डॉ. सय्यद यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. हजारे यांनी सहकाऱ्यांशी संवाद साधून उष्णता तसेच थकव्याचा त्रास जाणवत असल्याचे सांगितले. त्यामुळे लगेचच त्यांना नगर येथील नोबल रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. सुनिल बंदिष्टी, डॉ. मनोज मगर यांनी हजारे यांच्या विविध तपासण्या केल्या. सर्व तपासण्यांचे अहवाल पाहिल्यानंतर हजारे यांची प्रकृती स्थिर आहे व काळजीचे कारण नाही असे, नोबेल रूग्णालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचे शाम पठाडे यांनी सांगितले. हजारे यांची आणखी एक चाचणी करण्यात येणार असून डॉक्टरांनी त्यांना एक दिवस रूग्णालयात थांबण्याचा सल्ला दिला आहे. ही चाचणी केल्यानंतर हजारे यांना रूग्णालयातून सोडण्यात येणार आहे.
दरम्यान, हजारे यांनीही प्रतिक्रीया दिली असून मला पुर्ण बरे वाटते आहे, थोडासा थकवा असला तरी मला काहीही झाले नसल्याने कार्यकर्त्यांनी काळजी करण्याचे कारण नसल्याचे हजारे यांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anna hazare complains of fatigue hospitalized