जनलोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्याची मोठी जबाबदारी लोकसभा व राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्यांची होती. मात्र, त्यांनीही ही जबाबदारी सक्षमपणे पार न पाडल्याचे सांगून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज व राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात सरकारवर दबाव आणून जनलोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही हजारे यांनी केले आहे.
जनलोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते कमी पडल्याची नाराजी व्यक्त करणारे स्वतंत्र पत्र हजारे यांनी स्वराज व जेटली यांना शनिवारी पाठविले आहे. ज्यावेळी सत्ताधारी पक्ष कमजोर होतो त्यावेळी विरोधी पक्षाची भूमिका महत्वाची असते. मात्र, जनलोकपाल विधेयकाबाबत विरोधी पक्षाची भूमिकाही कमकुवत ठरल्याचे त्यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे.  
कोणतेही कारण नसताना जनलोकपाल विधेयक वर्षभरापासून राज्यसभेमध्ये पडून आहे. राज्यसभेचे हिवाळी अधिवेशनही लवकरच सुरू होणार आहे. परंतु, या विधेयकाच्या मंजुरीसाठी आपण योग्य प्रयत्न न केल्यानेच हे विधेयक दोन वर्षांपासून रखडल्याचे आपले व देशातील जनतेचे मत झाल्याचे नमूद करून येत्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर करण्यासाठी आपण सरकारवर दबाव आणून सरकारला तयार करावे, असे आवाहन हजारे यांनी जेटली यांना पाठविलेल्या पत्रात केले आहे. जेटली यांच्याप्रमाणेच श्रीमती स्वराज यांनाही त्यांनी अशाच स्वरूपाचे पत्र पाठवले आहे.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anna hazare criticised sushma swaraj arun jaitley