Anna Hazare Emotional दिल्ली विधानसभेचा निकाल लागला आहे. भाजपाने निर्विवाद बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे दिल्लीत भाजपाचा मुख्यमंत्री होणार ही बाब निश्चित आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांच्यासह अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. आम आदमी पक्ष हा अण्णा हजारेंच्या लोकपालच्या आंदोलनातून उभा राहिलेला पक्ष आहे. अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्यानंतर अण्णा हजारेंना प्रतिक्रिया विचारली ज्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

नाईलाजाने बोलावं लागलं म्हणताना अण्णांना अश्रू अनावर

एवढं प्रेम केलं तुमच्यावर, पण तुम्ही रस्ता सोडून गेलात. त्यामुळेच नाईलाजाने तुमच्याविरोधात बोलावं लागलं अशी प्रतिक्रिया देताना अण्णा हजारे भावनिक झाले होते. या आधीही अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. ऐन निवडणुकीच्या दिवशी अण्णा हजारे यांनी केजरीवाल हे स्वार्थी असल्याचं म्हटलं होतं. तसंच त्यांच्या पक्षाला मतदान करू नये असंही त्यांनी म्हटलं होतं. दिल्लीकरांनी ‘आप’ला नाकारलं असून स्वतः अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. निकालाच्या दिवशी अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.

एवढं प्रेम केलं तुमच्यावर- अण्णा हजारे

अण्णा हजारे म्हणाले की, “हीच आम्ही अपेक्षा ठेवली होती तुमच्याकडून, नाईलाजास्तव आम्हाला बोलावं लागलं. एवढं प्रेम केलं तुमच्यावरती. तुम्ही रस्ता सोडून गेलात म्हणून नाईलाजास्तव बोलावं लागलं.” अरविंद केजरीवाल यांना अनेक गोष्टी शिकवल्या. मात्र त्यांनी समाजाचा विचार केला नाही आणि राजकारणात गेले असे सांगत असताना झाले अण्णा हजारे भावूक झाल्याचं दिसून आलं. अरविंद केजरीवाल यांचे विचार, चारित्र्य शुद्ध नाही म्हणूनच त्यांचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी दिली आहे. सत्ता, पैसा, दारूची दुकानं डोक्यात गेल्यामुळेच केजरीवाल यांचा पराभव झाला अशी टीका अण्णांनी केली.

अरविंद केजरीवाल यांनी पक्ष काढला तेव्हापासून बोलणं बंद केलं-अण्णा

अण्णा हजारे म्हणाले की, “अरविंद केजरीवाल यांनी ज्यावेळेस राजकारणात जायचा निर्णय घेतला आणि पक्ष काढला त्यावेळेस पासून मी त्यांच्याशी बोलणे बंद केले. पक्ष काढल्यानंतर मी परत त्यांच्याशी कधीही बोललो नाही. त्या दिवसापासून मी संबंध तोडून टाकले. कारण माझ्यापुढे पक्ष विरहित समाजसेवा, देशहित हेचं प्रधान्य होतं आणि आम्हाला तेच हवं आहे.”

दिल्लीत २७ वर्षांनी कमळ फुललं

दिल्लीच्या निवडणुकीत २७ वर्षांनंतर जोरदार कमबॅक करत भाजपनं आम आदमी पक्षाचा धुव्वा उडवला. ७० पैकी तब्बल ४८ जागांवर विजय मिळवत भाजपनं दिल्ली काबीज केली. भाजपच्या तडाख्यात आपच्या दिग्गजांचाही पराभव झाला. आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा भाजपच्या परवेश वर्मांनी तब्बल चार हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही पराभवाचा धक्का बसला. आम आदमी पार्टीला गेल्यावेळच्या तुलनेत तब्बल ४० जागांचा फटका बसला.

Story img Loader