उपोषणाच्या सातव्या दिवशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा अशक्तपणा वाढून त्यांचा आवाजही क्षीण झाल्याने राळेगण सिद्घी परिवारामध्ये चिंतेचे वातावरण असल्याचे सोमवारी पाहावयास मिळाले. दरम्यान, आंदोलनास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी राज्यातून तसेच राज्याबाहेरून राळेगण सिद्घीत येणाऱ्या नागरिकांचा ओघ कायम आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी एकच्या सुमारास श्रीगोंदा व पारनेर तालुक्यातील नागरिकांनी हजारे यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नगर-पुणे महामार्गावर गव्हाणवाडी येथे अचानक रास्ता रोको आंदोलन केल्याने या महामार्गावर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
सकाळी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने अण्णांची तपासणी केल्यानंतर त्यांचा अशक्तपणा मोठय़ा प्रमाणावर वाढल्याचे सांगण्यात आले. अण्णांचा आवाजही क्षीण झाला असून, त्यांची प्रकृती ढासळू लागल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी गावातील महिलांनी लाक्षणिक उपोषणात मोठय़ा संख्येने सहभाग नोंदविला.
दरम्यान, अण्णांच्या प्रकृतीची डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांचे आतापर्यंत ४ किलो ६०० ग्रॅम इतके वजन घटले सांगण्यात आले.
नगर-पुणे महामार्गावर गव्हाणवाडी येथे दुपारी एकच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव, एरोंडली, गव्हाणवाडी तसेच पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण, नारायणगव्हाण आदी भागांतील नागरिकांनी हजारे यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अचानक रास्ता रोको आंदोलन सुरू केले. गव्हाणवाडी येथील पुलावरच नागरिक आडवे झाल्याने या महामार्गावरील वाहतूक तब्बल तासभर पूर्णपणे खोळंबली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा