कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाचा पहिलाच अलार्ड प्राईज-२०१३ हा एक लाख कॅनेडीयन डॉलरचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना बुधवारी रात्री प्रदान करण्यात आला. हजारे यांना  आजवर मिळालेल्या पुरस्कारांमध्ये हा सर्वाधिक रकमेचा पुरस्कार आहे. याच वर्षी हे पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत.
गेल्या दि. २५ ऑगस्ट रोजी ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाने हजारे यांच्यासह बांगलादेशातील सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. सीमा समर व लंडनच्या ग्लोबल विटनेस या समाजसेवी संस्थेची या पुरस्कारांसाठी निवड केली होती. दि. २४ ऑगस्टला हजारे यांना एक लाख कॅनेडीयन डॉलरचा प्रथम, सीमा समर व ग्लोबल विटनेस या स्वयंसेवी संस्थेस अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांकाचा (प्रत्येकी २५ हजार कॅनेडीयन डॉलर) पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
बुधवारी रात्री या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. हजारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला असून, त्यांच्या स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या खात्यावर या पुरस्काराची रक्कम जमा होणार असल्याची माहिती भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या कार्यालयाचे समन्वयक दत्ता आवारी यांनी दिली.
 

Story img Loader