अलीकडेच झालेली शस्त्रक्रिया तसेच वाढत्या वयाचा विचार करून येत्या दि. १० पासून सक्षम जनलोकपालाच्या मागणीसाठी उपोषण करू नये ही ग्रामस्थांनी ग्रामसभेत केलेली मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी रात्री अमान्य केली. माझे आयुष्य मी सर्वसामान्यांसाठी समर्पित केले असून, त्यांच्या प्रश्नासाठी आपण हे उपोषण करणारच, असा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला.  
राळेगणसिद्धी येथे काल रात्री सरपंच जयसिंग मापारी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. ढासळलेली प्रकृती विचारात घेऊन उपोषणाचा निर्णय मागे घ्यावा, आम्हाला तुम्ही हवे आहात असे भावनिक आवाहन ग्रामस्थांनी केले, मात्र हजारे यांनी ते फेटाळले. सामान्य माणसाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. सक्षम जनलोकपालासाठी गेल्या दोन वर्षांपासून आपण संघर्ष करीत असून सरकार मात्र जनतेची दिशाभूल करत आहे. हे विधेयक संमत करण्यास टाळाटाळ सुरू आहे. केवळ राज्यसभेत चर्चा होणे बाकी आहे. मात्र ती टाळली जात आहे. विरोधी पक्षही आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
हजारे उपोषणाच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर ग्रामस्थांनी हजारे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला. दरम्यान, राळेगणसिद्घी येथे येणारे कार्यकर्ते, माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी भोजन-चहापानाची व्यवस्था करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. उपसरपंच संपत उगले, विठ्ठल गाजरे, अरुण भालेकर, दत्ता आवारी, सुरेश पठारे, दादा पठारे, संजय पठाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.