Anna Hazare : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं. या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यावरून मंत्री धनंजय मुंडे यांचा विरोधकांकडून राजीनामा मागितला जात आहे. तसेच भाजपाचे आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात अनेक आरोप केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसरीकडे मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका बनावट दस्तावेज देऊन लाटल्याच्या प्रकरणात कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षाचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यावरून चांगलंच राजकारण तापंल. दरम्यान, या सर्व घडामोडींबाबत आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सूचक भाष्य केलं. “मंत्रिमंडळात असताना जेव्हा आरोप होतात तेव्हा एक क्षण सुद्धा पदावर राहणं चुकीचं आहे. लगेच राजीनामा देऊन मोकळं झालं पाहिजे”, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

अण्णा हजारे काय म्हणाले?

“कोणताही नेता असेल मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर आणि जे लोक मंत्रिमंडळात सामील होतात त्यांनी आपल्या जीवनाचा आदर्श ठेवला पाहिजे. आदर्श ठेवतांना आपले विचार, आचार शुद्ध ठेवले पाहिजेत. जीवन निष्कलंक ठेवलं पाहिजे. जीवनात त्याग ठेवला पाहिजे. जनतेसमोर हा आदर्श ठेवला तर जनता त्यांचं अनुकरण करते. पण मंत्रिच जर वाट सोडून चालायला लागले तर जनता कुठे जाईल? देश कुठे जाईल? याचा विचार करणं गरजेचं आहे. मंत्रिमंडळात असताना जेव्हा आरोप होतात तेव्हा एक क्षण सुद्धा पदावर राहणं चुकीचं आहे. लगेच राजीनामा देऊन मोकळं झालं पाहिजे. चूक झाली ना? लोक पाहतात ना? तर पदावर राहण्याची आवश्यकता नाही”, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

“आपली जबाबदारी आणि आपलं कर्तव्य समजून पहिलं राजीनामा देऊन मोकळं झालं पाहिजे. मी बोलतो म्हणजे असंच हवेत बोलत नाही. माझं आता ९० वर्ष वय झालं. ९० वर्षांच्या या जीवनात माझ्यावर थोडासा सुद्धा डाग नाही, असं जीवन जगलं पाहिजे. असंच वर्तन मंत्रिमंडळातील लोकांचं असलं पाहिजे. वास्तविक पाहता मंत्रिमंडळात समावेश करतानाच अधिच विचार केला पाहिजे. मंत्रिमंडळात कोणाचा समावेश केला पाहिजे आणि कोणाचा समावेश केला नाही पाहिजे हे आधीच ठरवले पाहिजे. मात्र, हे सुरुवातीला हे चुकतं आणि असं चुकल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात. त्यामुळे आमच्या राज्याचं आणि देशाचं नुकसान होतं, समाजाचं नुकसान होतं याचा विचार करणं गरजेचं आहे”, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.