फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन (एफआयए) या अमेरिकेतील भारतीयांच्या शिखर संघटनेकडून न्यूयॉर्क येथे दि. १८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या भारतीय स्वातंत्र्यदिन संचालनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे उद्या (गुरुवारी) अमेरिकेला रवाना होणार आहेत. हजारे यांनीच स्वत: ही माहिती पत्रकारांना दिली.
एफआयए या अमरिका स्थित शिखर संस्थेचे तीन राज्यातील पाच लाख भारतीय सभासद असून, या संघटनेमार्फत दरवर्षी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दरवर्षी भारतातील प्रमुख व्यक्तीला आमंत्रित केले जाते. यंदा हजारे यांना हा बहुमान मिळाला आहे. देशाबाहेरील हा सर्वात मोठा सोहळा मानला जातो. न्यूयॉर्क शहरातील प्रतिष्ठीत मेडिसन अ‍ॅव्हेन्यू येथे दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ च्या दरम्यान हा सोहळा साजरा होणार आहे. सोहळ्याच्या पूर्वसंध्येला हजारे तेथील पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.  वॉशिंग्टन, सॅन फ्रांसिस्को, अटलांटा, साउथ कॅरोलिना या प्रांतातील भारतीयही हजारे यांच्याशी संवाद साधणार आहेत. हजारे यांच्या सन्मानार्थ ठिकठिकाणी कम्युनिटी रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहेत. सिलीकॉन व्हॅली येथे कार्यरत असलेले भारतीय संगणकतज्ञ हजारे यांच्याशी हितगुज करणार आहेत. स्टॅनफोर्ड व पेनसिल्व्हनिया विद्यापीठांमध्येही हजारे व्याख्यान देणार आहेत. अमेरिकेतही लोकप्रतिनिधींनीही हजारे यांच्या भेटीत स्वारस्य दाखविले आहे.