ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी लोहारा तालुक्यातील पांढरी येथील भीमराव मुळे व अन्य एकास पोलिसांनी ताब्यात घेतले. मुळे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचे सांगत असून, दारूच्या नशेत आपण हे कृत्य केले. कोणत्याही नेत्याने आपणास असे करण्यास सांगितले नसल्याचा जबाब दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात प्रचार करू नये, या साठी अण्णा हजारे यांच्या कार्यालयात दूरध्वनी करून अज्ञात व्यक्तीने धमकी दिली होती. या बाबत हजारे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. हजारे यांनी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात डॉ. पाटील यांच्याविरोधात प्रचारपत्रके वाटू नयेत, तसेच डॉ. पाटील निवडणुकीत पडल्यास ठार मारू, अशी धमकी भ्रमणध्वनीवर देण्यात आली होती. या धमकीला न जुमानता हजारे यांनी तयारी केली. प्रचारपत्रके उस्मानाबाद मतदारसंघात मतदारापर्यंत पोहोचविली गेली. हजारे स्वत: डॉ. पाटील यांच्याविरोधात उपोषण करणार होते. मात्र, प्रशासनाने परवानगी न दिल्याने ते येऊ शकले नाहीत.
दरम्यान, पारनेर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून लोहारा तालुक्यातील भीमराव मुळे यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता तो स्वत:ला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे सांगतो. त्याचबरोबर आपण दारूच्या नशेत हजारे यांना धमकी दिली असल्याची कबुली देऊन, असे कृत्य करण्यासाठी आपणाला राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने सांगितले नसल्याचेही त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा