दिल्लीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी राळेगणसिद्घी येथे फोन करून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आशीर्वाद घेतले. हजारे यांनीही केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या. येत्या दि. १४ ला शपथविधीसाठी येण्याची गळ केजरीवाल यांनी हजारे यांना घातली, मात्र हजारे यांनी त्यास नकार देत दिल्लीत आल्यानंतर भेटण्याचे आश्वासन दिले.
दिल्ली विधानसभेचा कल आम आदमीच्या बाजूने सुरुवातीपासून दिसू लागल्यानंतर सकाळी दहा वाजताच केजरीवाल यांनी हजारे यांचे स्वीय सहायक दत्ता आवारी यांना फोन करून हजारे यांच्याशी बोलण्याची इच्छा प्रदर्शित केली. मात्र त्या वेळी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्याच पाश्र्वभूमीवर हजारे हे प्रसारमाध्यमांच्या गराडय़ात असल्याने हजारे व केजरीवाल यांचे संभाषण होऊ शकले नाही. त्यानंतर केजरीवाल यांनी पुन्हा दुपारी एक वाजता संपर्क केल्यानंतर हजारे व केजरीवाल यांच्यात संभाषण झाले.
केजरीवाल यांनी मिळविलेल्या यशाबद्दल हजारे यांनी आनंद व्यक्त करीत त्यांचे मनापासून अभिनंदन केले. शपथविधीसाठी हजारे यांनी उपस्थित राहिलेच पाहिजे अशी गळ केजरीवाल यांनी घातली. शपथविधीचे निमंत्रण देण्यासाठी पक्षाचा प्रतिनिधी अथवा स्वत:ही राळेगणसिद्घीत येण्याची तयारी केजरीवाल यांनी दर्शविली. परंतु हजारे यांनी त्यास नकार दिला. पक्ष व पाटर्य़ाच्या व्यासपीठावर मी कधीही जात नाही याची आठवण करून देत हजारे यांनी दिल्ली मुक्कामी आल्यानंतर नक्कीच भेट घेऊ असे आश्वासनही दिले.
दरम्यान, हजारे यांच्या मुशीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांने एकहाती दिल्लीचे तख्ख काबीज केल्याबद्दल राळेगणसिद्घीचे सरपंच जयसिंग मापारी यांच्यासह दादा पठारे, दत्ता आवारी आदींनी राळेगणसिद्घीच्या बसस्थानक चौकात फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.
हजारे यांनी आंदोलनाची घोषणा केल्यापासून राळेगणसिद्घीला भेट देणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. काही वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधीही येथे तळ ठोकून आहेत. दिल्ली विधानसभेच्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर देश-विदेशातील वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी तसेच देश तसेच राज्यपातळीवरील वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनीही मंगळवारी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा