कॅनडास्थित अनिवासी भारतीयाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना दिलेल्या धमकीच्या पाश्र्वभूमीवर राळेगणसिध्दी येथील हजारे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी गुरुवारी सकाळी येथे भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. हजारे यांच्याशीही त्यांनी सुमारे अर्धा तास चर्चा केली.
कॅनडास्थित गगन विधू या इसमाने त्याच्या फेसबुक अकौंटवर २४ व २५ फेब्रुवारीला हजारे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या पाश्र्वभूमीवर बुधवारी दुपारपासून हजारे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. हजारे यांना भेटण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाची धातूशोधक यंत्राने तपासणी करण्यात येते. नियमित सुरक्षा व्यवस्थेव्यतिरिक्त मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याने हजारे हे प्रथमच सुरक्षा रक्षकांच्या कोंडाळ्यात असल्याचे पहावयास मिळत आहे.
लखमी यांनी राळेगणसिद्घीत पोहोचल्यानंतर हजारे हे वास्तव्यास असलेल्या संत यादवबाबा मंदिराची त्यांनी बारकाईने पाहणी केली. तेथील सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात पोलीस निरीक्षक शरद जांभळे, तसेच विशेष पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांना सूचना देऊन तेथील सुरक्षेच्या बाबतीत जरासाही हलगर्जीपणा खपवून न घेण्याचा इशाराही त्यांनी दिला. गावाच्या रचनेची माहिती घेऊन कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्रात हजारे यांची लखमी यांनी भेट घेतली. हजारे यांचे स्वीय सहाय्यक दत्ता आवरी यांनी गौतम यांना माहिती दिली.
कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्रात लखमी यांनी हजारे यांची भेट घेऊन सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याची माहिती त्यांना दिली. सुरक्षा व्यवस्थेच्या आपण विरोधात असून शासनाने दिलेली सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याचे पत्र आपण यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना पाठवल्याचे हजारे यांनी लखमी यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, तुमच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची आहे. तुम्हाला आलेल्या धमक्यांच्या पाश्र्वभूमीवर शासनाने ही काळजी घेतली असल्याचे लखमी यांनी स्पष्ट केले.