‘राज्य सरकारला चिक्की चिकटली आहे का हे तपासवे लागेल’ असा मिश्कील टोमणा लगावत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी चिक्कीची प्रयोगशाळेत तपासणी करून त्यात भेसळ आढळून आल्यास ठेकेदारास जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी रविवारी राळेगणसिद्घी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
राज्याच्या महिला व बालकल्याण विभागात झालेल्या २०६ कोटी रुपयांच्या खरेदीतील घोटाळ्यावरून राज्यात गदारोळ उडालेला असतानाच हजारे यांनी या प्रकरणी रविवारी भूमिका मांडल्याने फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढली आहे. वादग्रस्त चिक्कीची प्रयोगशाळेत तपासणी करून चिक्कीत भ्रष्टाचार झाला आहे काय, चिक्की सरकारला चिकटली आहे का, हे पाहावे लागेल. हजारो बालकांच्या आरोग्याचा हा प्रश्न आहे. त्यामुळे कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस व भाजपने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप न करता प्रयोगशाळेत चिक्कीची तपासणी करावी. चिक्कीत भेसळ झाली असे निष्पन्न झाल्यास चिक्की पुरविणाऱ्या ठेकेदाराला जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणीही हजारे यांनी केली. मात्र या प्रकरणी हजारे यांनी या खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर थेट प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
खरेदीप्रकरणावरून राज्यात गदारोळ सुरू झाल्यानंतर हजारे यांना गेल्या आठवडय़ात प्रतिक्रिया विचारण्यात आली, त्यावेळी त्यांनी माहिती घेऊन सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. या प्रकरणाची अद्यापि आपण माहिती घेतली नसल्याने थेट प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही. आम्हाला कोणाकडून काही घ्यायचे नाही व काही मागायचेही नसल्याने या प्रकरणात तथ्य आढळून आल्यास त्याविरोधात निश्चित आवाज उठविला जाईल असे सूचक विधानही हजारे यांनी केले होते.
महिला व बालकल्याण विभागामार्फत अंगणवाडय़ांना पुरविण्यात येणाऱ्या आहारात गैरव्यवहार होत नाही असे म्हणता येणार नाही असे सांगून दोन वर्षांपूर्वी राळेगणसिद्घीतील आहाराची आपण स्वत: पाहणी केली असता ठेकेदाराकडून पुरविण्यात आलेल्या विविध वस्तू निकृष्ट असल्याचे उघडकीस आले होते. ठेकेदाराच्या वस्तू व संत यादवबाबा वसतिगृहातील वस्तूंची तुलना या खात्याच्या अधिकाऱ्यासमक्ष केल्यानंतर त्यावेळी ठेकेदाराचे पितळ उघडे पडले होते, असेही हजारे यांनी गेल्या आठवडय़ात सांगितले होते.
अंगणवाडय़ांमध्ये उद्याचे महापुरुष धडे गिरवित असताना या लहान कळ्यांच्या आहारातही गैरव्यवहार करणे योग्य नसल्याची टिप्पणीही हजारे यांनी त्यावेळी बोलताना केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा