महाराष्ट्रात दारूबंदी होण्याचा दिवस आता दूर नाही, प्रत्येक गावात दारूबंदी होताना महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान हाच कार्यकर्त्यांचा आनंद असेल, असे सांगतानाच नगर जिल्हय़ात दारूबंदी करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या मोहिमेत पहिली सही करून मी या आंदोलनास पाठिंबा देत असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी राळेगणसिद्घी येथे सांगितले.
नगर जिल्हा दारूबंदी आंदोलनाच्या वतीने जिल्हय़ात दारूबंदी करण्यासाठी पाच लाख सहय़ांच्या मोहिमेस हजारे यांची पहिली सही घेण्यात येऊन शुभारंभ करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हय़ातील दारूबंदी आंदोलनाचे सर्व तालुका कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. व्यसनमुक्तीचे कार्यकर्ते भाऊसाहेब येवले, बाळासाहेब मालुंजकर, अॅड. रंजना गवांदे, हेरंब कुलकर्णी हे या वेळी उपस्थित होते.
सेवाभावी वृत्तीने कार्यकर्त्यांनी दारूबंदीचे काम करावे, कार्यकर्त्यांनी हे काम करताना चारित्र्य हेच खरे सामथ्र्य आहे याची जाणीव ठेऊन वाटचाल करण्याचे आवाहन करून हजारे म्हणाले, दारूबंदीसाठी ग्रामसभा ही महत्त्वाची आहे, ग्रामसभा सक्षम झाली तर दारूबंदी चळवळ मजबूत होईल. आमच्या चळवळीने दारूबंदीचे अनेक कायदे केले, परंतु दुर्दैवाने त्याची फारशी अंमलबजावणी झाली नाही. दारूबंदीच्या चळवळीमुळे ही अंमलबजावणी यापुढील काळात होऊ शकेल. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही आडवी बाटलीच्या मतदानाने दारूबंदी झाली पाहिजे अशी अपेक्षा हजारे यांनी व्यक्त केली. ग्रामसभेचे सामथ्र्य स्पष्ट करून ग्रामसभा ही संसदेपेक्षा श्रेष्ठ आहे व तीच स्थायी स्वरूपाची आहे. या व्यवस्थेवर नागरिकांनी पहारा देण्याची खरी गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
या वेळी जिल्हय़ातील सर्व तालुका कार्यकारिणी सदस्यांचा हजारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दारूबंदी आंदोलनाच्या निमंत्रक अॅड. रंजना गवांदे यांनी आंदोलनाबाबत माहिती दिली. ग्रामसभेच्या सातशे ठरावांनंतर ही पाच लाख सहय़ांची मोहीम पूर्ण होईल. त्यासाठी ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत येत्या १५ ऑगस्टपर्यंत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
दारूबंदी मोहिमेला अण्णा हजारेंचा पाठिंबा
नगर जिल्हय़ात दारूबंदी करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या मोहिमेत पहिली सही करून मी या आंदोलनास पाठिंबा देत असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी राळेगणसिद्घी येथे सांगितले.
First published on: 29-06-2015 at 03:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anna hazare support campaign to ban alcohol