जनलोकपाल विधेयकला काँग्रेसचा विरोध असेल आणि ते संमत होणार नसेल, तर राजीनामा देण्याचा दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांचे समर्थन केले. अशा लोकांबरोबर सत्तेत राहण्यापेक्षा केजरीवाल यांनी राजीनामा दिलेला बरा, असेही ते म्हणाले.
केजरीवाल यांच्याशी रविवारी दिल्लीमध्ये झालेल्या भेटीचा संदर्भ देत हजारे म्हणाले, आम आदमी पक्षाने केलेला जनलोकपाल आणि स्वराज या कायद्यासंदर्भात त्यांनी माझ्याशी चर्चा केली. या कायद्याच्या मसुद्याचे माझ्या हस्ते प्रकाशन व्हावे, अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली. यासंदर्भात मी विचार करून सांगेन, असे त्यांना सांगितले. मात्र, या कायद्याला काँग्रेसचा विरोध आहे याकडे मी त्यांचे लक्ष वेधले. हा कायदा विधानसभेत मंजूर झाला, तर मसुद्याचे माझ्या हस्ते प्रकाशन करण्यासंदर्भात सांगेन, असेही केजरीवाल यांना सांगितले.
जनलोकपाल विधेयकाला काँग्रेसचा विरोध असल्याने विधानसभेत संमत न झाल्यास राजीनामा देण्याचा इशारा केजरीवाल यांनी दिला याकडे लक्ष वेधले असता हजारे यांनी केजरीवाल यांच्या निर्णयाचे समर्थन केले. खरेतर, खिचडी सरकार बनवू नये, असेच मी केजरीवाल यांना सांगितले होते. मात्र, पुन्हा निवडणुका होऊ नयेत यासाठी सत्ता स्थापन होणे महत्त्वाचे असल्याने केजरीवाल यांनी पुढाकार घेतला असेल, असेही ते म्हणाले.
आपल्या भागाच्या विकासामध्ये नागरिकांना योगदान देण्याचा अधिकार हे वैशिष्टय़ असलेला स्वराज कायदा आणणारे केजरीवाल हे देशातील पहिले मुख्यमंत्री आणि दिल्ली हे पहिलेच राज्य आहे. लोकशाहीमध्ये कोणत्या पक्षाने असा विचार केला, आपल्या हाती सत्ता कशी राहील हाच राजकीय पक्षांचा विचार असतो. स्वराज कायदा हा जनतेचा कायदा असल्याचे सांगून हजारे म्हणाले, आपल्याकडे वॉर्ड असतात तसे दिल्लीतील वॉर्डाना मोहल्ला म्हटले जाते. १८ वर्षांवरील कोणीही नागरिक आपोआप या मोहल्लाचे सदस्य होतात. मोहल्लाच्या बैठकीमध्ये त्या भागातील सुधारणा आणि विकासकामांबाबत निर्णय घेतला जातो. सरकारने विकासकामांचा निधी द्यायचा. यामध्ये सरकारचा हस्तक्षेप राहणार नाही. मी तर गेली अनेक वर्षे ग्रामसभा आणि वॉर्डसभेला अधिकार देण्याची मागणी सरकारकडे करीत आहे.
विविध मुद्दय़ांचा समावेश असलेला १७ कलमी मसुदा मी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिला आहे. त्याला त्यांनी उत्तरही दिले आहे. हा मसुदा पाच महिन्यांपूर्वी विविध मुख्यमंत्र्यांना पाठविला तेव्हा आम आदमी पक्षाची स्थापनादेखील झालेली नव्हती. त्यामुळे आता केजरीवाल यांनाही हा मसुदा दिला असून त्यांनी विचार करून उत्तर देऊ असे सांगितले असल्याचे अण्णांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परदेशी यांची बदली करणाऱ्यांना कायमचा धडा शिकवा
अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीसंदर्भात जनतेनेच आंदोलन करावे, अशी सूचना अण्णा हजारे यांनी केली. अशा लोकांना कायमचा धडा शिकवत जनतेने पुन्हा सत्तेवर आणू नये, ही अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मात्र, आधी घोषित केल्यानुसार आपण या आंदोलनाचे नेतृत्व करणार का या प्रश्नावर अण्णांनी सूचक मौन बाळगले.

परदेशी यांची बदली करणाऱ्यांना कायमचा धडा शिकवा
अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीसंदर्भात जनतेनेच आंदोलन करावे, अशी सूचना अण्णा हजारे यांनी केली. अशा लोकांना कायमचा धडा शिकवत जनतेने पुन्हा सत्तेवर आणू नये, ही अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मात्र, आधी घोषित केल्यानुसार आपण या आंदोलनाचे नेतृत्व करणार का या प्रश्नावर अण्णांनी सूचक मौन बाळगले.