राज्यसभेत लोकपाल विधेयक मंजूर झाल्याने देशाच्या इतिहासात ३८ वर्षांतील हे पहिलेच क्रांतिकारी पाऊल पडल्याचे सांगत या विधेयकाला पाठिंबा दिलेल्या राज्यसभेतील सर्व सदस्यांचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आभार मानले. या विधेयकामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मंगळवारी लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर उपोषण संपवणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यसभेत लोकपाल विधेयक मंजूर झाल्याचे समजताच राळेगणसिद्घीत एकच जल्लोष झाला.
लोकपाल लढय़ाचा विजय देशातील सर्वसामान्य जनतेचाच आहे. त्यामुळे हे विधेयक मंजूर करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांना आभार व्यक्त करणारे पत्र आपण जनतेच्या वतीनेच दिले आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची राजकीय तडजोड नसल्याचे सांगत राजकारणातील सर्वच लोक वाईट नाहीत किंवा आपला कोणालाही विरोध नाही, असे स्पष्ट करीत या विधेयकासाठी जसे गांधी यांनी समर्थन केले, तसेच नरेंद्र मोदी यांनीही समर्थन केले आहे.
 राइट टू रिजेक्ट, राइट टू रिकॉल, जनतेची सनद व ग्रामसभेला जादा अधिकार या कायद्यांसाठी पुढील काळातही लढा सुरू राहणार असून, जनजागृतीसाठी पुन्हा देशव्यापी दौरा सुरू करणार असल्याचे हजारे यांनी सांगितले.
राळेगणसिद्घी येथे संत यादवबाबा मंदिरात आजवर झालेली हजारे यांची सर्वच उपोषणे यशस्वी झाली आहेत. राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर यादवबाबा की जय अशा घोषणा दिल्या.   
अशक्तपणा वाढला
उपोषणाच्या आठव्या दिवशी हजारे यांचा अशक्तपणा वाढला आहे. चार किलो ६०० ग्रॅमने वजनात घट झाली आहे, तर लघवीतील केटोनचे प्रमाण तीन ते चापर्यंत वाढले आहे. याचा परिणाम यकृत, मेंदू, हृदय व मूत्रपिंडावर होऊ शकतो, अशी भीती आरोग्य पथकाने व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा