गेली दोन वर्षे चर्चा तसेच आश्वासने फार झाली असे सांगत ‘करेंगे या मरेंगे’चा नारा देत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारपासून जनलोकपालच्या मागणीसाठी राळेगणसिद्घीत उपोषणाची जय्यत तयारी केली आहे. उपोषणाच्या पाश्र्वभूमीवर सोमवारी राळेगणसिद्घीमधील सुरक्षाव्यवस्थेचा जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार दयाल व जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी राळेगणसिद्घीस सायंकाळी भेट देऊन आढावा घेतला.
राळेगणसिद्धीतील यादवबाबा मंदिरात हजारे मंगळवारी सकाळपासून उपोषण सुरू करणार आहेत. तत्पूर्वी राळेगणसिद्घीचे ग्रामस्थ प्रभातफेरी काढणार आहेत. त्यानंतर हजारे हे संत यादवबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन पद्मावती बनातील महात्मा गांधींच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करतील. तेथून हजारे यांची सजवलेल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात येईल. यादवबाबा मंदिर परिसरात मिरवणुकीची सांगता होईल. त्यानंतर हजारे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून, सकाळी ११च्या सुमारास हजारे संत यादवबाबा मंदिरात उपोषणास प्रारंभ करणार आहेत.
या परिसरात भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. तेथे येणाऱ्या कार्यकर्त्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वासाठी जेवणाची तसेच मुक्कामी राहणाऱ्यांसाठी निवासाचीही व्यवस्था राळेगणसिद्घी परिवाराने केल्याचे सरपंच जयसिंग मापारी यांनी सांगितले. राळेगणसिद्घीच्या ग्रामस्थांनीही उपोषणाच्या तयारीचा सायंकाळी आढावा घेऊन हजारे यांना त्यासंदर्भात माहिती देण्यात आल्याचे सरपंच जयसिंग मापारी यांनी सांगितले.
हजारे यांच्या आंदोलनासाठी राळेगणसिद्घीमध्ये हजारो नागरिक उपस्थित राहतील याचा अंदाज बांधून राळेगणसिद्घीमध्ये तीन अधिकारी तसेच सुमारे शंभर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पारनेरचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना सुरक्षाव्यवस्थेची माहिती दिली. सध्या नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त आणखी कर्मचारी तसेच काही मदत लागल्यास तशी तयारीही ठेवण्यात आली आहे. हजारे यांच्या भोवती सुरक्षारक्षकांचे कवच असून, त्यांच्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक सुनील शिवरकर यांच्यावर येथील सुरक्षाव्यवस्थेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राळेगणमधील सुरक्षाव्यवस्थेचा जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक दररोज आढावा घेणार असून, सुरक्षेत कोणताही कसूर राहू नये यासाठी दोन्ही अधिकारी काळजी घेत आहेत.