भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये केंद्र सरकारने वटहुकूमाच्या माध्यमातून सुचविलेल्या बदलांच्याविरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २४ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर अण्णा हजारे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. स्वतः हजारे यांनीच याबद्दल गुरुवारी राळेगणसिद्धीमध्ये पत्रकारांना माहिती दिली.
‘…मग १०० दिवसांत काळा पैसा आणण्याचे आश्वासन का दिले?’
लोकपालची अंमलबजावणी, भूमी अधिग्रहण विधेयक मागे घ्यावे, तसेच काळया पैशांबाबतची कार्यवाही या तीन मुद्यांवर हजारे यांनी नुकताच मोदी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहूनही अण्णा हजारे यांनी त्यांच्याकडे आपली भूमिका मांडली होती. काळा पैसा भारतात आणण्यासाठी वेळ लागणार हे माहिती होते, तर मोदींनी प्रचारावेळी १०० दिवसांत तो पैसा परत आणण्याचे आश्वासन का दिले, असा प्रश्न अण्णा हजारे यांनी काही दिवसांपूर्वी विचारला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भूतपूर्व प्रचारक व भारत स्वाभिमान चळवळीचे नेते गोविंदाचार्य यांनीही काही दिवसांपूर्वी अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता.