आम आदमी पार्टी दिल्लीत सरकार स्थापन करणार असून अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीत होणाऱ्या शपथविधीचे निमंत्रण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अद्याप मिळालेले नाही. मात्र निमंत्रण मिळाले तरी तब्येतीच्या कारणामुळे आपण त्या समारंभास उपस्थित राहू शकणार नाही, असे अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले.
जनलोकपाल विधेयकासाठी २०११ मध्ये अण्णा हजारे यांनी ज्या रामलील मैदानावर आंदोलनाची सुरुवात केली, त्या मैदानावर २६ डिसेंबर रोजी शपथविधी कार्यक्रमास परवानगी द्यावी, अशी विनंती केजरीवाल यांनी नायब राज्यपाल नजीब जंग यांना केली होती.
जनलोकपाल आंदोलनातील माजी सहकारी केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले का, असे पत्रकारांनी विचारले असता त्यांनी ‘नाही’ असे सांगितले. केजरीवाल यांच्याशी काही दिवसांपूर्वी बोलणे झाल़े  मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे शपथविधीच्या कार्यक्रमास सध्याच्या परिस्थितीत हजर राहणे शक्य होणार नाही, असेही हजारे यांनी सांगितले.
अण्णांनी केजरीवाल यांच्या राजकीय पक्ष स्थापनेच्या निर्णयाचे समर्थन केले नव्हते. तसेच नुकत्याच राळेगण येथील उपोषणादरम्यान अण्णांच्या समर्थकांनी केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर पक्षनिर्मितीच्या निर्णयावरून टीका केली होती. त्यानंतर केजरीवाल यांनीही अण्णांची भेट घेतली नव्हती.
दिल्लीत सरकार स्थापन करण्याबाबत ‘आप’ने घेतलेल्या निर्णयाबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास अण्णांनी नकार दिला. ‘आप’ने काँग्रेसच्या घेतलेल्या पाठिंब्याबाबत केजरीवाल म्हणाले की, केजरीवाल यांना जे काही योग्य वाटेल, ते त्यांनी करावे.