भ्रष्टाचार संपविण्याचे काम सरकार करत नाही. म्हणूनच आम्हाला आमच्या संघटनेच्या माध्यमातून करावे लागते आहे. संघटनेच्या नावातून भ्रष्टाचार शब्द वगळण्यासंदर्भात अद्याप मला कोणतीही नोटीस मिळालेली नसून, ती मिळाल्यावर कायदेशीर सल्ला घेऊ आणि गरज पडल्यास न्यायालयात दाद मागू, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी सांगितले.
अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन या संघटनेच्या नावातून भ्रष्टाचार शब्द काढून टाकण्यात यावा, यासाठी पुण्यातील धर्मादाय आयुक्तांनी बुधवारी त्यांना नोटीस बजावली. संस्था, संघटनेच्या नावात भ्रष्टाचार शब्द असणाऱया सर्वांनाच धर्मादाय आयुक्तांनी नोटीस बजावली असून, भ्रष्टाचार हा शब्द काढण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, भ्रष्टाचार संपविण्याचे काम सरकारने करावे, असे धर्मादाय आयुक्त कार्यालयातील लोकांना वाटत असेल. पण सरकार हे काम करीत नाही. म्हणूनच आम्हाला ते करावे लागते आहे. अजून यासंदर्भातील नोटीस मिळालेली नाही. ती मिळाल्यावर कायदेशीर सल्ला घेऊ आणि गरज पडल्यास न्यायालयात जाऊ, असे त्यांनी सांगितले.