डोळय़ांचा आजार बळावल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा जनतंत्र यात्रेचा दौरा रद्द करण्यात आला आहे. दि. २३ जून ते १९ जुलैदरम्यान उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशात जनतंत्र यात्रेच्या चौथ्या व पाचव्या टप्प्यादरम्यान ५७ ठिकाणी ते जनतेशी संवाद साधणार होते.या दौऱ्यासाठी हजारे बुधवारीच राळेगणसिद्घीहून रवाना झाले होते. पुण्यात डॉ. वाघ यांच्याकडे डोळय़ांची तपासणी करून ते मुंबई मार्गे गुरुवारी उत्तर प्रदेशातील मुरादाबादला विमानाने जाणार होते. मात्र पुण्यात बुधवारी सायंकाळी डोळय़ांची तपासणी केल्यानंतर हजारे यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. सुमारे वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर त्यांच्या डोळय़ांवर छोटी शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे.
मागील वर्षी हजारे यांच्या डोळय़ांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे देशभर दौरे सुरूच असून, विश्रांतीअभावी त्यांच्या डोळय़ांचा आजार बळावल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हजारे वीस दिवस आता सक्तीची विश्रांती घेणार असून त्यानंतर शस्त्रक्रियाही करण्यात येईल. त्यातून पूर्णपणे बरे झाल्यानंतरच जनतंत्र यात्रेच्या चौथ्या व पाचव्या टप्प्याच्या तारखा जाहीर करण्यात येतील असे भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे समन्वयक दत्ता आवारी यांनी सांगितले.
मुंबईत गुरुवारी आयोजित केलेल्या वन खात्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहून हजारे राळेगणसिद्घीला परतणार आहेत.

Story img Loader