सक्षम जनलोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. १० डिसेंबरपासून ते राळेगणसिध्दी येथेच यादवबाबा मंदिरात उपोषण सुरू करणार आहेत. प्रकृतीमुळे प्रवास शक्य नसल्याने त्यांनी दिल्लीतील आंदोलनाचा बेत रद्द केला आहे.
हजारे यांनी बुधवारी पत्रकारांना ही माहिती दिली. अलीकडेच शस्त्रक्रिया झाल्याने डॉक्टरांनी त्यांना प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे हजारे यांनी आपल्या आंदोलनाचे स्थळ बदलले. सक्षम जनलोकपाल बिलाच्या मागणीसंदर्भात पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री वी. नारायणसामी यांनी हजारे यांना पत्र पाठवून लोकपाल बिलासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आल्याचे म्हटले होते. या पत्राला हजारे यांना उत्तर देताना रामलीला मैदानावर आंदोलन न करता इतर ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते.
देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईसाठी जनतेने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करून हजारे म्हणाले, या आंदोलनात पक्ष वा पार्टी सहभागी होणार नाही. जोपर्यंत सक्षम जनलोकपाल संमत होणार नाही तोपर्यंत आपण आपले उपोषण मागे घेणार नाही.

Story img Loader