राजकीय पक्षाची स्थापना केल्यानंतर आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी आज प्रथमच राळेगणसिध्दी येथे येऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. महागाईच्या मुद्दय़ावर येत्या दि. २३ पासून केजरीवाल दिल्लीत आंदोलन सुरू करणार आहेत. त्या अनुषंगाने दोघांची बंद खोलीत दीड तास चर्चा झाली, मात्र हजारे यांनी नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केजरीवाल यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट करून या आंदोलनासाठी त्यांना आशीर्वाद दिले असे सांगितले.
बंद खोलीतील चर्चेनंतर हजारे व केजरीवाल या दोघांनी प्रसारमाध्यमांशी स्वतंत्रपणे संवाद साधला.    
केजरीवाल म्हणाले, दिल्लीतील जनता महागाईने त्रस्त झाली आहे. महागाईविरोधात आपण बेमुदत उपोषण सुरू करणार असून त्यामागे राजकीय समर्थनाचा हेतू नाही. सामान्यांना त्रस्त करणाऱ्या महागाई विरोधात हाती घेण्यात आलेल्या लढय़ास अण्णांचा आशीर्वाद घेण्यासाठीच आपण येथे आलो. महागाईविरोधात सर्व समविचारी कार्यकर्त्यांंना बरोबर घेउन आंदोलन करण्यात येणार आहे. आपले आंदोलन यशस्वी होईल असा आशीर्वाद अण्णांनी दिल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
अण्णा म्हणाले, महागाईमुळे सर्वसामन्य जनता त्रस्त झाली आहे. सर्वसामांन्यांच्या प्रश्नासाठी अरविंद आंदोलन करीत आहे ही समाधानाची बाब आह़े  केजरीवाल यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली असल्याने त्यांच्या व्यासपीठावर जाऊन पाठींबा देणार नाही, मात्र जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांंशी चर्चा करून केजरीवाल यांच्या आंदोलनास आशीर्वाद देणार असल्याचे अण्णांनी स्पष्ट केल़े  केजरीवाल यांच्या राजकीय पक्षास कोणत्याही प्रकराचे समर्थन देण्यात येणार नसल्याचे ते म्हणाले.