पिंपरी-चिंचवड : त्यांचे शिक्षण अवघे पाचवीपर्यंतचे…याच शिक्षणामुळे एक कटू अनुभव आला त्यातून अवलीयाने शाळा उभा केली…अवघ्या १४ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या मराठी शाळेत आता मात्र तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या अवलीयाचे नाव आहे अण्णासाहेब जाधव… आणि त्यांचं वय आहे अवघं ८४…या वयातही ते जवळपास रोजच शाळेत ठाण मांडून असतात. अण्णांचे शिक्षण केवळ पाचवीपर्यंत झाले असले तरीही त्यांनी हातात घेतलेला शिक्षणाचा वसा मोठ्या अधिकाऱ्यांनाही लाजवेल असाच आहे.
अण्णासाहेबांनी वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी बॉईज आर्मी मध्ये नोकरी सुरु केली. तिथे त्यांनी तीन वर्षे नोकरी केली,त्यानंतर ते एस.आर.पी, पोलीस, एयरफोर्स अशा ठिकाणी शासकीय नोकरी केली. हा प्रवास सुरु असताना पुण्यात यायचं या ध्येयाने त्यांनी एका नामांकित कंपनीत काम सुरू केले. हे सगळे करत असताना त्यांनी इंडस्ट्रीयल कुस्तीमध्ये सलग चार वर्षे चॅम्पियनशिपचा ‘किताब जिंकून दाखवला. त्याच कंपनीतील वरिष्ठ कर्मचारी म्हणून त्यांना सगळे ओळखू लागले. यावेळी १२ वी पास असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला आपला अनुभव जास्त असूनही बढती देण्यात आली. ही सल पुढचा बराच काळ मनात राहीली. त्यावेळी शिक्षणाचे महत्त्व खऱ्या अर्थाने लक्षात आल्याचे ते सांगतात. तेव्हा आपण शिक्षण घेतलं नसलं तरी गरीब आणि होतकरू मुलांना शिक्षण द्यायचा पण त्यांनी यावेळी केला. याच जिद्दीने श्री शिव छत्रपती शिवाजीराजे विद्यालयाचा जन्म झाला.
१० जून १९८५ ला केवळ १४ विद्यार्थ्यांसोबत पिंपरी-चिंचवड मध्ये ही शाळा सुरू करण्यात आली. त्यावेळी अण्णा त्याच कंपनीत काम करत होते. परंतु आज ही परिस्थिती बदलली असून १४ विद्यार्थ्यांवरून शाळेच पट तब्बल ३ हजार विद्यार्थ्यांवर गेला आहे. याबरोबरच १०० जणांचा कर्मचारी वर्ग आहे. शाळेला सरकारकडून अनुदान मिळते. यावर्षी सत्याहत्तर विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले असून शहरात या शाळेचे नावलौकिक आहे. आजही अण्णा शाळेत येऊन स्वतः लक्ष देत विद्यार्थांना आणि शिक्षकांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे येथील कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी यांचा आत्मविश्वास द्विगुणित होत आहे.
शाळेत केवळ पुस्तकी नाही तर प्रात्यक्षिकातून धडे दिले जातात. यंदा दहावीच्या २२३ विध्यार्थ्यांनी परीक्षा दिली पैकी २०३ विध्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांहून अधिक मिळवले आहे. त्यातील ७७ विध्यार्थ्यांना तर ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. शिक्षण कमी तिथं नोकरीची नाही हमी, हा अनुभव त्यांना आला आणि तिथंच अण्णांनी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे अण्णांची ही शाळा राज्यासाठी नव्हे तर देशासाठी रोलमॉडेल आहे असं म्हणायला हरकत नाही.