ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी राजीनामा दिल्याचं जाहीर केल्यानंतर राज्यभरात गदारोळ निर्माण झाला. तसंच, हा राजीनामा स्वीकारला नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. राजीनामा दिल्यानंतर याची वाच्यता कुठेही करू नका असं सराकरकडून सांगण्यात आल्यानंतरही छगन भुजबळांनी जाहीर व्यासपीठावरून राजीनामा दिल्याचं जाहीर केलं. ही वेळ त्यांच्यावर का आली? याबाबत छगन भुजबळांनी आज खुलासा केला आहे.
“कोणत्याही पक्षाने माझा राजीनामा मागितला नव्हता. पण मला वाटत होतं की मी तिथे (ओबीसी एल्गार सभेला) जातोय, तर मला सरकारविरोधात बोलावं लागेल. त्यामुळे मी राजीनामा दिला. परंतु, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री म्हणाले की राजीनामा दिल्याची गोष्ट बाहेर सांगू नका. म्हणून मी पावणे तीन महिने काहीच बोललो नाही.
“विरोधकांनी टीका केली की मंत्रिमंडळात बसता आणि सरकारविरोधात बोलता. विरोधकांच्या या टीकेवर मी गप्प बसलो. पण सरकार पक्षातील एक आमदार म्हणाला की भुजबळला लाथ मारून बाहेर काढा. लाथा मारायची भाषा ऐकली तेव्हा मी म्हणालो की राजीनामा दिल्याचं आता नाही सांगणार तर कधी सांगणार? सरकारमधील आमदार म्हणत होते की यांना लाथाडा आणि बाहेर काढा. आणि मी काही बोललो नसतो तर म्हणाले असते किती बेशरम माणूस आहे की खुर्चीला चिकटून बसला आहे. कोणी मला लाथ मारण्याची गरज नाही. त्यामुळे मी म्हणालो की राजीनामा दिला आहे, जा जाऊन तो स्वीकारा”, असं छगन भुजबळ म्हणाले.
खोट्या दाखल्यांवर कुणबी लिहिलं जातंय
“मराठा समाज शक्तीशाली लोक आहे. त्यांच्यात गरिबी आहे. पण गरिबी कुठे नाही? मला आरक्षण असताना मी आरक्षण घेतलं नाही. मी खूपपूर्वी सवलत घेतली होती. पण मी आणि माझ्या मुलांनी आरक्षण घेतलं नाही. पण तरीही मी लढतोय. कारण, ओबीसी समाजातील ५४ टक्के लोक शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांना जरा पाठिंबा मिळाला तर ते इंजिनिअर, डॉक्टर बनतात आणि कुटुंबाला पुढे नेतात. पण आता सगळं संपतंय. खोट्या दाखल्यांवर कुणबी लिहिले जात आहेत. ते कुणबी झाले तर ते ओबीसी बनतील. त्यामुळे, आम्ही काय म्हणतोय त्यांना वेगळं आरक्षण द्या. पण हे मागच्या दाराने येत आहेत”, अशी टीकाही छगन भुजबळांनी केली.