अबू जुंदालच्या तक्रार अर्जावर दहशतवादविरोधी पथक व जुंदालचे वकील असे उभय बाजूंचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर न्यायालयाने २२ एप्रिल रोजी पुढील सुनावणी करण्याचे जाहीर केले. जुंदालने मंगळवारी पुन्हा एकदा दहशतवादविरोधी पथकाकडून त्रास दिला जात असल्याचा कांगावा केला, तर सरकारी पक्षाने हा दावा खोडून जुंदालचा कटात महत्त्वपूर्ण सहभाग असल्याचा दावा केला.
नाशिक शहरातील महत्त्वपूर्ण ठिकाणांची रेकी करून बॉम्बस्फोट घडविण्याचा कट रचल्याच्या संशयावरून आंतरराष्ट्रीय दहशतवादी अबू जुंदालविरोधात गुन्हा दाखल करून ५७ पानी आरोपपत्र जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्यात आले होते. त्यानंतर जुंदालने दहशतवादविरोधी पथकाकडून त्रास दिला जात असल्याचा अर्ज न्यायालयास सादर केला. त्यावर तपास यंत्रणेने आपले म्हणणे मंगळवारी न्यायालयासमोर मांडले. महाराष्ट्र पोलीस अकादमी, पोलीस आयुक्तालय, तोफखाना स्कूल आदी संवेदनशील स्थळांची रेकी केल्याच्या प्रकरणात यापूर्वी बिलाल शेख आणि हिमायत बेग यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांच्या मदतीने अबू जुंदालने पोलीस प्रशिक्षण केंद्र व तोफखाना दलाच्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ला करण्याचा कट रचला होता. बिलालने महत्त्वपूर्ण ठिकाणांची रेकी केल्यानंतर त्याला आरडीएक्स पाठविण्यात आले होते. या कटात जुंदालचा सहभाग असल्याचा दावा सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. जुंदालच्या वकिलाने त्याच तक्रारींचा पुनरुच्चार केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ एप्रिल रोजी होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा