मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत तर जखमींना तीन लाखांची मदत
अलिबाग: आरसीएफ कंपनीच्या थळ प्रकल्पात झालेल्या स्फोट दुर्घटनेतील मृतांची संख्या चारवर पोहोचली आहे. दुर्घटनेतील जखमी साजिद सिद्दीकी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान कंपनी व्यवस्थापनाने मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची तर जखमींना तीन लाखांची तातडीची मदत व उपचार खर्च देण्याचा निर्णय घेतला आहे.
बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. कंपनीच्या बाष्प निर्मिती संयत्र नियंत्रण कक्षात वातानुकूलन यंत्रणा बसविण्याचे काम सुरु होते. यावेळी अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. या तिघांना उपचारासाठी नवीमुंबईतील फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील साजिद सिद्दीकी यांचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुघापत झाली होती. अन्य दोन जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान या संपुर्ण दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय तज्ञ सदस्यांची चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, फँक्ट्री इंस्पेक्टर, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाच्या सदस्यांनी दुर्घटना स्थळाची पहाणी केली आहे. दुर्घटनेनंतर कंपनीतील सर्व संयत्रांचे प्रचलन सुस्थितीत सुरु आहे अशी माहिती कंपनीचे मुख्य महाव्यवस्थापक श्रीनिवास कुलकर्णी यांनी दिली आहे.