राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात आल्यापासून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक असणारे अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. यामुळे विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. तर हे प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच महाराष्ट्राबाहेर गेले, असा दावा शिंदे सरकारकडून केला जात आहे.
कोट्यवधींची गुंतवणूक असणारे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची माहिती समोर आली आहे. ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र सोडलं आहे.
हेही वाचा- Bharat Jodo Yatra : “महाराष्ट्रातून जसे मोठे प्रकल्प गायब होताय, तसेच १५ लाखही गायब झाले”
सुप्रिया सुळेंनी ‘लोकमत’ आणि ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्ताचा हवाला देत, ऊर्जा निर्मिती प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “महाराष्ट्र सरकारचे आणखी एक अपयश…राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे वेदान्त फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क आणि टाटा एअरबस हे तीन मोठे प्रकल्प या सरकारच्या डोळ्यांदेखत गुजरातला गेले आहेत. यानंतर आता ‘ऊर्जा उपकरण निर्मिती झोन’ प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर…”
खरं तर, गेल्या काही महिन्यांत वेदान्त फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क आणि टाटा एअरबस यांसारखे अनेक मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आणि लाखो तरुणांना रोजगार निर्माण करण्याची क्षमता या प्रकल्पांमध्ये होती, यावरून विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे.