उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी दगडफेक करण्यात आली होती. घराबाहेर असलेल्या त्यांच्या वाहनांचीही जाळपोळ करण्यात आली होती. घटनेच्यावेळी प्रकाश सोळंके घरातच होते. या घटनेनंतर सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांना काही आरोपींना अटक केली आहे. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. तसंच, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा लक्ष्य केलं आहे.
“मराठा आंदोलकांनी माझा जीव वाचवला. या घटनेसाठी मराठा आंदोलकांना अजिबात दोषी धरत नाही. जमाव मोठा असल्यानं पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नसेल,” अशी प्रतिक्रिया सोळंके यांनी दिली. त्यावर सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोष व्यक्त केला.
हेही वाचा >> घरावर दगडफेक, वाहनांची जाळपोळ, गृहमंत्रालय अपयशी ठरलं का? प्रकाश सोळंके म्हणाले, “पोलिसांनी…”
“राज्य सरकारला पाठिंबा देणारे आमदार स्वतः सांगत आहेत त्यांच्या घरावर झालेला हल्ला पूर्वनियोजित होता. हल्लेखोरांकडे हत्यारे, पेट्रोलबॉम्ब, दगड आदी होते. या संपूर्ण घटनाक्रमात पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली असेही त्यांचे म्हणणे आहे. ते गृहखाते आणि गृहमंत्री महोदयांचे अपयश अधोरेखित करीत आहेत. जर या राज्यात सत्ताधारी आमदारांचीही घरे सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय हा प्रश्न आहे. राज्याचे गृहमंत्री सपशेल अपयशी ठरलेत आणि त्यांना गृहखाते झेपत नाही याचा हा आणखी मोठा पुरावा आहे. मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने गृहमंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यांना छत्तीसगडमध्ये प्रचारासाठी मोकळे करावे”, अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी X वर केली आहे.
आमदार सोळंके यांनी काय प्रतिक्रिया दिली?
जाळपोळ रोखण्यात गृहमंत्रालय अपयशी ठरलं का? या प्रश्नावर प्रकाश सोळंके म्हणाले, “त्याठिकाणी ५ ते ६ पोलीस अधिकारी उपस्थित होते. जमावापुढे पोलीस काय करणार? पोलिसांनी लाठीहल्ला, हवेत गोळीबार आणि अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या असत्या. पण, जमावावर कारवाई केली असती, तर चिथावणी दिल्यासारखं होईल. म्हणून पोलिसांनी कारवाई केली नसेल.”