रत्नागिरी : नकारात्मक अहवाल वरिष्ठांकडे न पाठवण्यासाठी रत्नागिरीच्या जिल्हा पुरवठा अधिका-याला पुरवठा विभागाच्याच कर्मचा-या कडून ११ हजार रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले. या अधिका-यावर शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.रत्नागिरी येथील लाच लुचपत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी (वर्ग १) या पदावर कार्यरत असलेले प्रदीप प्रितम केदार याला ११ हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात लाच लुजपत विभागाला यश आले. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देणारे तक्रारदार हे संगमेश्वर येथे पुरवठा निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या अखत्यारित असणाऱ्या संगमेश्वर येथील धान्य गोदामाला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग आणि संगमेश्वर तहसीलदार यांनी २२ मार्च रोजी भेट दिली होती. त्यावेळी तक्रारदार पुरवठा निरीक्षक हे त्याठिकाणी गैरहजर होते. तसेच त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी केदार याने तक्रारदार यांच्या अखत्यारीतील गोदामाची तपासणी करून धान्य साठ्यामध्ये तफावत असल्याचे आणि गैरहजर असल्याचे सांगत तुमचा वरिष्ठ कार्यालयास नकारात्मक अहवाल पाठवणार अशी भीती घातली. मात्र असा अहवाल पाठवायचा नसेल तर १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार तडजोड होवून जिल्हा पुरवठा अधिकारी केदार यांनी दिनांक २८ मार्च रोजी ११ हजार रुपये लाचेची मागणी करून ती घेऊन येण्यास तक्रारदाराला सांगितले. ही लाचेची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वीकारताना जिल्हा पुरवठा अधिकारी केदार याला लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रंगेहात पकडले.

केदार याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित२०१८) चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवून त्याच्यावर पुढील कार्यवाही करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत लुचपत प्रतिबंधक खात्याच्या रत्नागिरी कार्यालयात सुरू होती. लाचलूचपत विभागाचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव यांच्यासह सहाय्यक फौजदार चांदणे, पोहवा. दीपक आंबेकर, पोहवा. संजय वाघाटे. पोह. विशाल नलावडे पोअं. राजेश गावकर यांनी ही कारवाई यशस्वी केली.