नगर: शहराजवळील ऐतिहासिक व स्वातंत्र्याच्या चळवळीत महत्त्वपूर्ण घटनांचा साक्षीदार असलेल्या भुईकोट किल्ल्यात स्वातंत्र्यदिनी युवकांच्या टोळक्याने देशविरोधी घोषणाबाजी केली. या टोळक्यातील ५ जणांना लष्करी जवान व पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील तिघे अल्पवयीन आहेत. अटक केलेल्या दोघा आरोपींचे वकीलपत्र घेण्यास वकिलांनी नकार दिला. या आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर एका हिंदूुत्ववादी कार्यकर्त्यांने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
शहराजवळील ऐतिहासिक भुईकोट किल्ला सध्या लष्कराच्या ताब्यात आहे. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन अशा राष्ट्रीय उत्सवाच्या वेळी तो नागरिकांना पाहण्यासाठी खुला ठेवला जातो. दुपारी तीनच्या सुमारास किल्ल्यातील हत्तीदरवाजा भागात, दग्र्याजवळ पाच युवकांच्या टोळक्याने देशविरोधी वादग्रस्त घोषणाबाजी केली. तेथे बंदोबस्तासाठी असलेले लष्कराचे जवान पवनसिंग, दिलीप भीषण, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे हवालदार सचिन धोंडे, व्ही. एन. राठोड, श्री. पवार, महिला पोलीस एस. बी. साळवे यांनी लगेच तिघांना ताब्यात घेतले. इतर दोघे मात्र पळून गेले. पाचही जणांविरुद्ध आर्मर्ड बेसिक ट्रेनिंग रेजिमेंटचे हवालदार प्रशांतकुमार श्रीचंदेश्वरसिंग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींना दि. १९ पर्यंत कोठडी
अटक केलेल्या परवेज इजाज पटेल (रा. अमिना मशीदजवळ, आलमगीर, भिंगार, नगर) व अरबाज शेख (रा. कोठला, नगर) या दोघांना भिंगार कॅम्प पोलिसांनी आज, बुधवारी दुपारी वरिष्ठस्तर सहदिवाणी न्यायाधीश व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी विनोद डोंगरे यांच्यापुढे हजर केले. सायंकाळी या दोघा आरोपींना १९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे यांनी सांगितले.
न्यायालयात गर्दी
संवेदनशील विषयामुळे न्यायाधीशांच्या दालनात वकिलांनी गर्दी केली होती. आरोपींनी देशविरोधी कृत्य केल्याने त्यांचे वकीलपत्र कोणीही घ्यायची नाही, असा निर्णय वकिलांनी घेतला. त्यामुळे इतर सर्व सुनावण्या संपल्यानंतर सायंकाळी उशिरा दोघा आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्याचा निर्णय न्यायालयाने दिला.
हल्ल्यानंतर मोठा बंदोबस्त तैनात
दोघा आरोपींना न्यायालयापुढे हजर केल्यानंतर सुनावणी ऐकण्यासाठी न्यायालयाच्या दालनात मोठी गर्दी झाली होती. याच दरम्यान या गर्दीतील हिंदूत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता अमोल हुंबे पाटील याने न्यायाधीशांसमोरच आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हाताने मारहाण करत त्याने आरोपींना तुम्हाला ‘भारतमाता की जय’ म्हणायलाच लावणार, असे सांगितले. त्याचवेळी त्याला तेथे बंदोबस्तास असलेल्या भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे यांनीही फौजफाटय़ासह न्यायालयात धाव घेतली. सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालयाच्या आवारात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.