सातारा: उत्तर प्रदेश मधील हाथरस मध्ये सर्वधर्मीय बाबाच्या सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एकशे सोळा पेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले. अनेक लोक अजून उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर जादुटोणा विरोधी कायदा लागू करावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

महाराष्ट्रात अंनिसच्या प्रयत्नातून झालेल्या जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत दैवी शक्तीचा दावा करणे आणि त्या द्वारे लोकांना फसवणे हा गुन्हा आहे. असाच कायदा देशभर लागू केला तर या सारख्या बाबांना आळा बसेल. पूर्वाश्रमी पोलीस कर्मचारी असलेल्या स्वतः ला बाबा नारायण हरी व स्वययंघोषित देवाचा अवतार म्हणवून घेणाऱ्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामधूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याने भक्त गोळा केले. याचे गांभीर्य विचारात घेता सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. राजकीय नेत्यांनी अशा बाबा बुवांना पाठीशी घालू नये असे अंनिसचे मत आहे.

हेही वाचा : “मुनगंटीवार कार्यक्षम मंत्री, ते राज्यातच राहिल्याने…”, जयंत पाटलांनी कौतुक करत जखमेवर मीठ चोळलं

खा. मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या धर्तीवर जादूटोणाविरोधी कायदा देशभर लागू करण्याची मागणी केली आहे, तशीच मागणी लोकसभेतही करावी. महाराष्ट्रातील कायद्याने मागील दहा वर्षांत बाबा बुवांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना शिक्षा झाल्याने हा कायदा सर्वधर्मीय अंधश्रद्धा निर्मूलन करणारा असल्याचे सिद्ध झाले आहे. या कायद्याच्या गैर वापराची एक देखील घटना समोर आलेली नाही. अंनिस वतीने मिलिंद देशमुख, डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, अण्णा कडलास्कर, नंदिनी जाधव, रामभाऊ डोंगरे, फारुख गवंडी सम्राट हटकर, मुंजाजी कांबळे, प्रकाश घादगिने, प्रशांत पोतदार, मुक्ता दाभोलकर, विनोद वायंगणकर, अशोक कदम, प्रविण देशमुख यांनी हे आवाहन केले आहे.