जादूटोणा विरोधी कायद्यात अनेक त्रुटी असून त्याबाबतच्या शंकांचे समाधान झाल्याशिवाय आमचा पाठिंबा मिळणार नाही अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतल्यामुळे जादूटोणा विरोधी कायद्याचे विधेयक याही अधिवेशनात लटकण्याची शक्यता आहे.
सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जादूटोणा विरोधी अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्याचे विधेयक मंजूर करण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वीच केली असून कोणत्याही परिस्थितीत हे विधेयत मंजूर झाले पाहिजे असे आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपल्या पक्षाला दिले .
विरोधी शिवसेना-भाजपा युतीने रविवारी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना विधेयकास आपला विरोध नाही, मात्र त्यातील तरतुदी स्पष्ट नसल्यामुळे तसेच हा कायदा सर्व धर्मीयांना लागू होणार आहे का, याची स्पष्टता सरकारने केल्याशिवाय त्यास आमचा पाठिंबा गृहित धरू नये अशी भूमिका घेतल्यामुळे या विधेयकाची कोंडी कायम आहे.
जादूटोणा व अनिष्ट रूढी,अघोरी प्रथांना आळा घालण्याबाबतचा कायदा गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे.वारकऱ्यांनी या कायद्यातील काही तरतुदींना आक्षेप घेतला आहे. मात्र या कायद्यासाठी पाठपुरावा करणारेअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाल्यानंतर राज्य सरकारने जादूटोणा विरोधी कायद्याचा अध्यादेश काढला.
जादूटोणा, नरबळी यांना प्रतिबंध झाला पाहिजे अशी विरोधकांचीही भूमिका आहे. मात्र या कायद्याबाबतच्या शंकांवर सरकारने खुलासा करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा