रत्नागिरी शहरा जवळील शिरगाव ग्रामपंचायतीने बांगलादेशी नागरिकाला दिलेल्या दाखल्या वरुन वाद पेटला असताना आणखी एका बांगलादेशी महिलेला रत्नागिरी शहरातून दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले. रत्नागिरीत सलग दुस-यांदा घडलेल्या याप्रकाराने पुन्हा खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी शहरातून दहशत विरोधी पथकाच्या मुंबई पोलिसांनी एका बांगलादेशी महिलेला ताब्यात घेतले. पकडण्यात आलेली ही महिला बांगलादेशातील ढाका येथे मूळची रहाणारी आहे. मात्र ती गेले पाच वर्षांपासून रत्नागिरी शहरात रहात असल्याचे उघडकीस आले आहे. सलमा राहील बोंबल (वय ३०) रा. सफा अपार्टमेंट, चिरायू हॉस्पिटलच्या मागे रत्नागिरी व पती राहील बोंबल (वय ३३) मूळचा राहणार सावर्डे चिपळूण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा >>>सिंहगड रस्त्यावर चंदन चोरी करणारा गजाआड
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, बांगलादेशीय महिला ही पहिली गुहागर मधून रत्नागिरीत आली होती. या बांगलादेशी महिलेचा जन्म दाखला चिपळूण मधील एका सरकारी कार्यालयातून देण्यात आल्याने उघडकीस आले आहे.या बांगलादेशी महिलेचा नवरा राहील बोंबल हा मिरकरवाड्यामध्ये मच्छी विक्रीचा व्यवसाय करतो. पकडण्यात आलेल्या सलमाकडे आधार कार्ड, पॅन कार्ड व जन्म दाखलाही मिळाल्याने आता सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी लोकांना आधार कार्ड, पॅन कार्ड व जन्म दाखले देत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांची ही चौकशी करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. ताब्यात घेण्यात आलेली सलमा राहील बोंबल ही मूळची ढाका येथील असून ती पहिल्यांदा गुहागर येथे आली होती. त्यानंतर गुहागर मधून ती रत्नागिरी आल्याचे सांगण्यात येत आहे. ही महिला गुहागरमध्ये कशी आली? कोणाकडे होती? गुहागरमध्ये तिचे काही नातेवाईक आहेत का ? यांचा तपास आता पोलीस करीत आहेत.