टोलविरोधी कृती समितीने माझ्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याच्या मुद्याचा फेरविचार करावा. याऐवजी कामगारमंत्री हसन मुश्रीफ व मी असे दोघेही ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील वा अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या घरी टोलसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी येण्यास तयार आहोत, अशा आशयाचे पत्र गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांना पाठविले आहे.     
आयआरबी कंपनीने १७ ऑक्टोबरपासून टोलआकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर त्यास टोलविरोधी कृती समितीने विरोध दर्शविला आहे. कृती समितीने नव्याने आंदोलनाला सुरुवात करण्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार १६ ऑक्टोबर रोजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या पाश्र्वभूमीवर मंत्री पाटील यांनी निवास साळोखे यांना पत्राद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.     
पत्रात म्हटले आहे, १६ ऑक्टोबर रोजी पूर्वनियोजित दौ-यांमुळे सातारा संपर्कमंत्री म्हणून मला तेथील कार्यक्रमांना उपस्थित राहणे आवश्यक आहे. सार्वजनिक जीवनात आदर्श मानतो ते ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील व अ‍ॅड. पानसरे यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी येणे ही गोष्ट मला मनाला वेदना देणारी आहे. मी व मुश्रीफ आघाडी शासनामध्ये मंत्री आहोत. त्यामुळे आम्ही दोघेही आपणास एकत्रित भेटू इच्छितो. त्यादृष्टीने आपण मोर्चाऐवजी आम्हा दोघांच्या सोयीच्या दिवशी एकत्रित बसून चर्चा करण्याचे नियोजन करावे. त्यासाठी पाटील वा पानसरे यांच्या घरी येण्याची आमची दोघांची तयारी आहे.

Story img Loader