काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार उभी करण्यात आली होती. यानंतर स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या दोन्ही प्रकरणात आरोपी असलेल्या माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एएस बोपन्ना आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणातील आरोपी प्रदीप शर्मा यांनी यापूर्वी जानेवारीमध्ये मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. पण मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. यानंतर प्रदीप शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.

यावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला. आज (बुधवार, २३ ऑगस्ट) अखेर सर्वोच्च न्यायालयाने माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर केला.

नेमकं प्रकरण काय?

२५ फेब्रुवारी २०२१ रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर एक स्कॉर्पिओ कार आढळली होती. ही कार स्फोटकांनी भरली होती. या घटनेनंतर दहा दिवसांनी ४ मार्च रोजी संबंधित या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत आढळला होता. त्यांनी संबंधित कार चोरीला गेल्याची तक्रारही दाखल केली होती.

एप्रिल २०२१ मध्ये, राष्ट्रीय तपास यंत्रणेने याबाबतचा तपास हाती घेतल्यानंतर, या प्रकरणाचा तपास करणारे तत्कालीन एपीआय सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्यासह इतर नऊ जणांसह अटक केली होती. या प्रकरणातील पुरावे नष्ट करणे आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येत प्रमुख आरोपी सचिन वाझेला मदत केल्याचा आरोप प्रदीप शर्मा यांच्यावर करण्यात आला होता. यानंतर आता प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Antilia bomb scare case mansukh hiren murder former encounter specialist pradeep sharma granted bail supreme court rmm