सुनील तटकरे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवणाऱ्या आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर तोफ डागणारे बॅरिस्टर ए. आर. अंतुले एकाकी पडले असल्याचे दिसून येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर रोहा येथे मंगळवारी झालेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांनी हजेरी लावल्याने आता काँग्रेसमध्ये अंतुले यांच्या शब्दांना किंमत राहिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सुनील तटकरे यांच्या प्रचाराची तयारी करण्यासाठी रोह्य़ातील सी. डी. देशमुख सभागृहात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या संयुक्त बैठकीसाठी दोन्ही पक्षांतील सर्व प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी सुनील तटकरे यांच्या विरोधात उघडलेल्या बंडामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र या बैठकीला माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार माणिक जगताप, माजी मंत्री रवीशेठ पाटील, माजी आमदार मधुकर ठाकूर, आणि मुष्ताक अंतुले हेदेखील या बैठकीला उपस्थित होते.
आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही सर्व जण तटकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे या वेळी स्पष्ट केले. आघाडीच्या माध्यमातून सोपवली जाईल ती जबाबदारी आपण पार पाडणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले. त्यामुळे तटकरे यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकवणारे अंतुलेच आता एकाकी पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
तटकरे यांच्यावर असणारा अंतुले यांचा राग स्वाभाविक असला, तरी त्यांनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्या विरोधात केलेली टीका योग्य नसल्याचे पक्षातील नेत्यांना वाटते. त्यामुळे एके काळी ज्या अंतुलेंना विचारल्याशिवाय जिल्हा काँग्रेस कमिटीत निर्णय होत नसत, त्याच अंतुलेंपासून दूर राहण्याची वेळ काँग्रेस नेत्यांवर ओढावली आहे. यात अंतुले यांचे जावई मुष्ताक अंतुले यांचाही समावेश आहे. विकासकामे कशी करावीत हे तटकरे यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे.
 आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यामुळे ते माझ्यावर जी जबाबदारी सोपवतील ती मी पार पाडेन, असे त्यांनी जाहीर केले.
त्यामुळे आता तटकरे यांच्या विरोधात जाहीर बंड करणारे अंतुले एकाकी पडले असल्याचे दिसून येत आहे. किंबहुना अंतुले यांच्याबरोबर आपणही पक्षश्रेष्टींच्या नाराजीचे धनी होऊ नये याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. माणिक जगताप, रवीशेठ पाटील आणि मधुकर ठाकूर यांना सहा महिन्यांनंतर विधानसभेची निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे त्यांना तटकरे आणि राष्ट्रवादीच्या मदतीची गरज भासणार आहे. त्यामुळे अंतुलेच्या बंडखोरीपासून चार हात लांब राहणेच या सर्वानी पसंत केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा