कर्जत : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या पक्षामधून जिल्हाध्यक्ष व प्रवेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देणाऱ्या अनुराधा नागवडे व राजेंद्र नागवडे हे पती-पत्नी उद्या बुधवार दिनांक 23 रोजी मुंबई येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांमध्ये प्रवेश करणार आहेत. राजेंद्र नागवडे यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.
श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथे झालेल्या मेळाव्यामध्ये नागवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या सर्व पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यानंतर ते पुढे काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला असून. ते शिवबंधन बांधणार आहेत. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळावी यासाठी श्री नागवडे प्रयत्न करत असून त्यासाठीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा…Sandeep Naik : “शब्द फिरवला गेला, माझी कोंडी झाली”, तुतारी फुंकताच संदीप नाईकांचे भाजपावर टीकास्र
महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीसाठी चुरस
श्रीगोंदा विधानसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये स्पर्धा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना या महाविकास आघाडीतील दोन्हीही पक्षांनी श्रीगोंदा विधानसभेच्या जागेसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. यामुळे या जागेचा चांगलाच घोळ झाला असून ही जागा कोणत्या पक्षाला मिळणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चूरस असल्याचे पाहावयास मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या गटाकडून माजी आमदार राहुल जगताप हे उमेदवारी मिळावी यासाठी मुंबई येथे तळ ठोकून बसले आहेत. तर नागवडे देखील महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार फील्डिंग लावून बसले आहेत.