‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेतलं आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अर्णब यांच्या अटकेमुळे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर या प्रकरणावर टाकलेली ही नजर…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील ५२ वर्षीय इंटिरियर डिझायनर (अंतर्गत वास्तुरचनाकार) अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी अलिबागजवळील कावीर येथे आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी ‘रिपब्लिक टीव्ही’चे अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरुद्ध अलिबाग पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला. अर्णब  व अन्य दोघांनी नाईक यांचे पैसे थकवल्याने ते निराश झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे याचवेळी नाईक यांच्या ७३ वर्षांच्या आई कुमुद यांचाही मृतदेह घरात सापडला होता.

मुळचे कावीर येथे राहणारे अन्‍वय नाईक  हे मुंबईत व्‍यवसायानिमित्‍त राहत होते. अन्वय हे मुंबईत ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ या नावाने अंतर्गत वास्तूरचना आणि सजावटीचा व्यवसाय करायचे. आत्महत्येच्या एक दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी ४ मे रोजी अन्वय कावीर येथील आपल्या घरी आले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी तेथील नोकरांना त्यांचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला. तर त्यांच्या आईचाही मृतदेह तिथेच होता. पोलिसांना त्याठिकाणी आत्महत्येपूर्वी लिहिलेली जी चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीमध्ये अर्णब गोस्वामीसह, आयकास्ट  स्लॉशस्काय मिडियाचे फिरोज शेख, मगरपट्टा येथील ‘स्मार्ट वर्क्स ’चे नितेश सारडा या तिघांनी केलेल्या कामाचे पैसे थकवल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे.

या आत्महत्येनंतर नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा या तिघांची नावे लिहिली होती. तसेच नाईक यांच्या पत्नीनेही दिलेल्या तक्रारीवरून या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तत्कालीन पोलीस अधीक्षक अनिल परस्कार यांनी दिली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anvay naik suicide case and republic tv editor arnab goswami arrest connection scsg