रत्नागिरी जिल्ह्य़ात करोनाबरोबर ‘सिव्हीयर अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन’ (सारी) ही न्यूमोनियाची लक्षणे असलेली साथही धोकादायक पातळीवर आहे.

जिल्ह्य़ात सध्या ‘सारी’ आणि ‘इली’ (एन्फ्ल्युएन्झा लाइक इलनेस) या दोन रोगांचे मिळून २ हजार ३६१ संशयित रुग्ण असून त्यापैकी ३३७ जणांना लागण झाली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. इतरांच्या तपासण्या सुरू आहेत. यातील आणखी गंभीर बाब म्हणजे, या रोगामुळे आत्तापर्यंत १४ जणांचा मृत्यू ओढवला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याच्या अन्य भागांप्रमाणे जिल्ह्य़ात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात शंभर टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. त्यामध्ये करोनाचे संशयित किंवा लागण झालेल्या रुग्णांचे प्रमाण नगण्य राहिले, पण ‘सारी’चा मोठय़ा प्रमाणात आढळून आल्याने त्याबाबत उपाययोजनेवर जास्त लक्ष केंद्रित केले जात आहे.

सारीच्या आजारामध्ये अन्य काही आजार एकत्रितपणे होत असल्याने हा समूहरोग म्हणून गणला जातो. ‘सारी’ आणि ‘करोना’ हे वेगवेगळे आजार असले तरी या दोन्ही आजारांची प्राथमिक लक्षणे सारखीच असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले. तसेच सारीच्या रुग्णांवर वेळीच उपचार झाले तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. सारीच्या आजारात ताप आणि जंतुसंसर्ग होऊन सूज येते. त्याचबरोबर न्यूमोनिया होऊन रक्तातील प्राणवायूचे प्रमाण खालावते. त्यावर तातडीने उपचार झाले नाहीत तर हृदय, मेंदू, किडनी निकामी होतात. या आजाराचे योग्य निदान झाले नाही तर तापाचे विषाणू रक्तात मिसळतात. रक्त तपासणीनंतरही काही वेळा आजाराचे योग्य निदान होत नाही. जिल्ह्य़ात मागील साडेपाच महिन्यांपासून सारीच ९२७ रुग्ण आढळून आले. यामध्ये ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये २४४ रुग्ण, तर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ६८३  रुग्णांचा समावेश आहे.

या साथीचे रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ३३६ रुग्ण आहेत. संगमेश्वर (८८), खेड (६४), दापोली (६२) आणि मंडणगड (५५)  या आणखी चार तालुक्यांमध्येही प्रत्येकी पन्नासपेक्षा जास्त सारीचे संशयित रुग्ण आढळले आहेत.

यंत्रणेपुढे संकट

त्यामुळे आरोग्य यंत्रणेपुढे नवे संकट उभे राहिले आहे.दरम्यान, करोना नियंत्रण अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्य़ातील सर्व कुटुंबांना दोन वेळा भेटी देऊन संशयित रुग्णांचा शोध घेण्यात आला. पहिली फेरी १० ऑक्टोबपर्यंत घेण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्य़ातील ९ तालुक्यांमधील मिळून ४ लाख ४० हजार ५७२ घरांमधील १५ लाख ४२ हजार ६१२ जणांचे सर्वेक्षण करण्यात आले. १४ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत दुसरा टप्पा पूर्ण झाला.

या दोन सर्वेक्षणांद्वारे केलेल्या तपासण्यांमध्ये करोनाची लागण झालेले फक्त ३३७ रुग्ण निष्पन्न झाले आहेत. तशीही रत्नागिरी जिल्ह्य़ात आता ही महामारी बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आली असून संपूर्ण जिल्ह्य़ात मिळून दररोज जेमतेम १५ ते २० करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. मात्र या रोगाचा जास्त त्रास होऊ शकतो असे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंड विकार इत्यादी प्रकारचे १ लाखापेक्षा जास्त (१ लाख १२ हजार ७९) रुग्ण आढळून आले आहेत.

Story img Loader