Sharad Pawar Resigns : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल (३ मे) ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली. त्यांच्या या अनाकलनीय घोषणेमुळे पक्षातील सर्वचजण नाराज झाले आहेत. कार्यकर्त्यांपासून नेतेमंडळींनी त्यांना फेरविचार करण्याची विनंती केली आहे. काल (मंगळवारी) दिवसभरात सर्वपक्षीय नेत्यांनी शरद पवारांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तर त्यांच्यासमोरच व्यासपीठावरच भरल्या डोळ्यांनी त्यांना निर्णय मागे घेण्याची मागणी केली. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ट्वीटद्वारे शरद पवारांना राजीनामा परत घ्यावाच लागेल, अशा शब्दांत अधिकारवाणीने शरद पवार यांना साद घातली आहे.
हेही वाचा >> राजकीय चातुर्यात उद्धव ठाकरे कमी पडले! ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकात शरद पवार यांचे निरीक्षण
जितेंद्र आव्हाड ट्वीटमध्ये म्हणतात की, “पवार साहेब तुम्हांला राजीनामा देण्याचा अधिकार कोणी दिला. कुठलीही भूमिका घेताना ज्या बाजूने लोकहीत आहे त्याच बाजूने निर्णय झाला पाहिजे; कदाचित तो आपल्या मनाला पटला नाही तरी चालेल. पण लोकशाहीच्या विरोधात कुठलाही निर्णय जाता कामा नये असे तुम्ही आम्हांला सांगत आले. आणि आज कोणाचाही विचार न करता तुम्ही राजीनामा देऊन आम्हांला वाऱ्यावर सोडून निघून जात आहात. या सगळ्या वादळ वाऱ्यांना आम्ही गेली अनेक वर्षे तोंड देत आहोत ते केवळ एकच शब्दामुळे शरद पवार. साहेब तुम्हांला असं महाराष्ट्रातील तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना अनाथ करून जाता येणार नाही. तुम्हांला राजीनामा परत घ्यावाच लागेल.”
शरद पवारांनी राजीनामा जाहीर केल्यानंतर अनेक नेत्यांनी पवारांभोवती घेराव घालत आपल्या भावना सादर केल्या. यावेळी जितेंद्र आव्हाडही तिथे उपस्थित होते. शरद पवारांचा हा निर्णय ऐकून आमदार जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर झाले. “आपण सर्वाचे अश्रू आणि भावनाही पाहत आहात. गेल्या ६० वर्षांच्या काळात कार्यकर्त्याच्या मनात काय चाललंय, हे बघणारे जादूगार आहात तुम्ही. वय हा तुमच्यासाठी प्रश्न नाही आहे. २००४ साली नागपूरमध्ये तोंडातून रक्त वाहत असताना आम्ही तुम्हाला प्रचार करताना पाहिलं आहे. आताची तब्येत तुलनेनं खूप बरी आहे. त्यामुळे तुम्ही हा राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
हेही वाचा >> “लोक त्यांचंही ऐकायला तयार नाहीत, उद्यापासून…”, शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली भीती
आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात उद्यापासून तीव्र आंदोलनं सुरू होतील. लोक पवार साहेबांचंही ऐकायला तयार नाहीत. त्यांनी राजीनामा मागे घेतला पाहिजे, हीच त्यांची मागणी आहे. मी स्वतः ३५ ते ४० वर्ष राजकारणात आहे, त्यांचं बोट धरून पुढे आलो आहे. ते राजकारणात नसतील तर आम्ही तरी कशाला राहायचंय या राजकारणात. संपलं आमचं पण राजकारण. हीच भावना अनेकांची आहे. शरद पवार हे लोकभावनेचा आदर करणारे, लोकशाही मानणारे नेते आहेत. ते लोकांच्या भावनेचा आदर करतील, ते सकारात्मकपणे विचार करतील आणि योग्य तो निर्णय घेतील.