राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून एका वृत्तवाहिनीशी बोलताना अपशब्द वापरले आहेत. यावरून आता राजकीय वातावरण चांगलच तापायला सुरूवात झाली आहे. सत्तारांच्या या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया उमटत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांना अल्टिमेटम दिला आहे.
आमदार अमोल मिटकरी म्हणाले, “दोन दिवसांपूर्वीच शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन झालं, ज्याला आम्ही प्रशिक्षण शिबीर म्हणतो. त्या शिबीरात सुप्रिया सुळे यांनी आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना भविष्यात कशा पद्धतीने काम करायचं हे सांगितलं. अशावेळी कुठल्याही पक्षाची महिला असेल, कुठल्याही धर्माची महिला असेल तिच्याबद्दल शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात जो महिलांचा सन्मान आहे, त्याला अनुसरूनच आहे. तशीच शिकवण आम्हाला त्या शिबीरात दिल्या गेली. नव्हे तर आमचा पक्ष तो प्रोटोकॉल पाळत असतो. दोन दिवसांपूर्वी सत्तेतील आमदार गुलाबराव पाटील यांनीही एक वक्तव्य केलं होतं, त्यावरूनही संतापाचे वातावरण निर्माण झाले होते आणि आता सत्तेचा माज असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार वेळ पडली तरी मीही त्यांना अपशब्द या चॅनलवर वापरू शकतो. परंतु ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे मला संस्कृतीच्या बाहेर जायचं नाही. परंतु जो शब्द अब्दुल सत्तार नावाच्या व्हायात माणसाने वापरला आहे. मला माझ्या पक्षाचे संस्कार विसरून पुढची पातळी गाठता येते, मात्र ते शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना खपणार नाही. म्हणून मी संयमाने बोलत आहे. अब्दुल सत्तारांना आमचा अल्टिमेट आहे. २४ तासांच्या आत सुप्रिया सुळेंची नाक घासून माफी मागावी, अन्यथा त्याला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही. त्याने वापरलेला शब्द हा समस्त स्त्री जातीचा अपमान आहे. त्याला जो सत्तेचा उन्माद झालाय, त्याची मस्ती आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाही.” एबीपी माझाशी ते बोलत होते.
हेही वाचा >> अब्दुल सत्तारांना खुलं पत्र: महिलांना शिवीगाळ करण्यात कसला आलाय पुरुषार्थ ?
याशिवाय “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला समज द्यावी, अन्यथा त्याच्यामुळे हे अधोगतीकडे जाण्याची शक्यता आहे. हे प्रकरण त्यांनी तापवू नये. सुप्रिया सुळे यांच्या सारख्या संसदरत्न स्त्रीबद्दल अब्दुल सत्ताराने असे अपशब्द वापरले असेल, तर त्याला त्याची लायकी आम्ही दाखवून देऊ.” असा इशाराही अमोल मिटकरी यांनी दिला आहे.