महात्मा गांधी आदिवासी छात्रालयाचा आधारवड
नितीन बोंबाडे, डहाणू
आजवर हजारो बालकांना त्यांचे हक्काचे आधार मिळवून देणारे शिक्षण प्रसारक मंडळ संचालित महात्मा गांधी छात्रालय अर्थात ‘आधाराश्रम’ ठरले आहे. स्थापनेपासून आजतागायत कार्यशील असलेले आप्पा भोये यांनी ९० वर्षांत पदार्पण केले आहे. या वयातही ते तितकेच क्रियाशील आहेत.
आदरणीय आचार्य भिसे यांच्या प्रेरणेने सन १९५० मध्ये ६८ वर्षांपूर्वी कासा येथे सवरेदय केंद्रात आप्पा भोये अर्थात दावजी भिवा भोये यांनी समाजसेवेचा वसा स्वीकारला.
आप्पांनी आपल्या उमेदीच्या काळात आदिवासी सेवा मंडळात काम केले, जंगल कामगार सोसायटी, आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी, ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, ठाणे जिल्हा मध्यवर्ती खरेदी विक्री केंद्राचे चेअरमन, कासा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन असलेले आणि आता शिक्षण प्रसारक मंडळ ठाणेचे विद्यमान सेक्रेटरी म्हणून ते आजही ९०व्या वयातही ते क्रियाशील आहेत.
महात्मा गांधी आदिवासी वसतिगृह आणि आदिवासी वसतिगृह आशागड येथे वसतिगृहाची व्यवस्था आहे. आदिवासींमधील १० ते १६ वर्षांपर्यंतची शेकडो मुले या वसतिगृहांत शिक्षण घेत आहेत.
समाज कल्याण समितीच्या आदेशानुसार आणि ठाणे जिल्हा शिक्षण प्रसार मंडळाच्या नियमानुसार बालकांना येथे दाखल करून घेतले जाते.
आप्पा भोये यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९३० रोजी जव्हार येथील उक्षीपाडा येथे झाला. वाडा येथे शिक्षण घेत असताना त्यांचा आचार्य भिसे यांच्याशी संपर्क आला. १९४८च्या सुमारास त्यांनी अहमदनगर येथे शेतकी प्रशिक्षण घेतले. दरम्यान, आचार्य भिसे यांनी त्यांच्या डहाणू येथील सवरेदय केंद्रात भोये यांना सेवा कार्याचा सल्ला दिला.
१९६०च्या सुमारास भूकबळी आणि सावकारांच्या जाचाच्या काळात गरीब मुले शाळेत येण्यास नकार देत. याच वेळी भोये यांनी स्थानिक बोर्डाच्या शाळा ताब्यात घेतल्या. ज्या शाळांमध्ये मुलांची उपस्थिती नाही तिथे त्यांनी स्वावलंबी छात्रालय योजना सुरू केली.
१९६० मध्ये जंगल कामगार सोसायटीच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा पुरविण्यात आल्या. आदिवासी भागाच्या उत्कर्ष करण्यात जंगल कामगार सोसायटय़ांचे मोलाचे सहकार्य लाभले. सध्या ठाणे जिल्हा प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष आमदार आनंद ठाकूर, कार्याध्यक्ष माजी मंत्री शंकर नम, उपाध्यक्ष मुकुंद आप्पा चव्हाण, सहसचिव पांडुरंग बेलकर यांच्या देखरेखीखाली संस्थेच्या शाळांच्या विस्तार कारभार सांभाळला जात आहे. यात सेवाव्रती आप्पा भोये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी धडपडत आहेत.